विंडीजविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने धडाकेबाज कामगिरी करत विजय संपादन केला आहे. २-१ च्या फरकाने इंग्लंडने ही मालिका जिंकली. स्टुअर्ड ब्रॉडने या सामन्यात १० बळी आणि अर्धशतक झळकावत अष्टपैलू कामगिरी बजावली. याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये ब्रॉडने ५०० बळींचा टप्पाही पूर्ण केला. या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून ब्रॉडचं कौतुक होतंय. भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराजनेही ब्रॉडचं कौतुक केलंय.

अवश्य वाचा – Eng vs WI : ऐसा पहली बार हुआ है…ब्रॉडच्या विक्रमी कामगिरीने जुळून आला अनोखा योगायोग

युवराज सिंह आणि ब्रॉड यांच्यातलं द्वंद्व हे प्रत्येकाला परिचीत आहे. २००७ टी-२० विश्वचषकात युवराजने ब्रॉडच्या षटकात ६ चेंडूवर ६ षटकार ठोकत विक्रम केला होता. एखाद्या गोलंदाजाचा यानंतर धीर खचला असता, परंतू ब्रॉडने आपल्या कामगिरीत सातत्याने सुधारणा करत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. गेली काही वर्ष ब्रॉड इंग्लंडच्या कसोटी संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे. युवराजनेही ब्रॉडच्या या कामगिरीचं कौतुक करत, त्या सहा षटकारांचा उल्लेख करु नका…कसोटीत ५०० बळी घेणं म्हणजे विनोद नाही असं युवराजने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलंय.

अष्टपैलू कामगिरीसाठी ब्रॉडला सामनावीर आणि मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेनंतर इंग्लंडचा संघ आयर्लंडविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर घरच्या मैदानावर इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळेल.

अवश्य वाचा – Eng vs WI : इंग्लंडच्या विजयात ब्रॉड चमकला, मोडला ४० वर्ष जुना विक्रम