भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याने आज मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेबरोबर युवराजच्या १८ वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम लागला आहे. मागील बऱ्याच काळापासून चांगली कामगिरी करण्यात युवराजला अपयश येत होते. कामगिरीमधील सातत्य न राखता असल्याने त्याला संधीही देण्यात आली नव्हती. असे असले तरी कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आला नाही असा पराक्रम आपल्या नावावर करणारा युवराज हा एकमेव खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन विश्वचषक जिंकणाऱ्या संघांमध्ये युवराजचा समावेश होता. यामध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषकाचा समावेश आहे.

सन २००० सालापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा युवराज आपल्या १८ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. २००० साली कोलंबोमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना युवराजने ६७.५० च्या सरासरीने ४० चेंडूत २७ धावांची महत्वपूर्ण खेळी करत भारताच्या विजयामध्ये महत्वाचा वाटा उचलला होता.

त्यानंतर २००७ झाली झालेल्या पहिल्यावहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्येही पाकिस्तानविरुद्ध खेळताना युवराजने चांगला खेळ केला होता. या सामन्यामध्ये युवराजने ७३.६८ च्या सरासरीने १९ चेंडूत १४ धावांची खेळी केली होती. पहिल्यांदाच टी-२० सामने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळवले जात असल्याने युवराजची ही खेळी महत्वाचीच ठरली.

या दोन विश्वचषक स्पर्धांव्यतिरिक्त २०११ साली भारतीय संघाने जिंकलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही युवराजने मोलाचे योगदान दिले होते. २७५ धावांचा पाठलाग करताना भारताची सलामीची जोडी झटपट बाद झाल्यानंतर गंभीर आणि कोहलीने भारताच्या डावाला सावरले. त्यानंतर आलेल्या धोनीने मैदानात जम बसवत भारताची विजयाची आशा कायम ठेवली. मात्र विजयासाठी ५२ धावांची गरज असताना गौतम गंभीर ९७ धावांवर बाद झाला. त्यावेळी मैदानात उतरलेल्या युवराजने परिस्थितीचा अंदाज घेत संयमी खेळी करत धोनीला साथ दिली. एकीकडे धोनी आक्रमाक फटकेबाजी करत असतानाच दुसरीकडे युवराज संधी मिळेल तिथे चोरट्या धावा घेत धोनीला जास्तीत जास्त स्ट्राइक देताना दिसला. धोनीने विजयी षटकार मारला त्यावेळी नॉन स्टायकर्स एण्डला असणाऱ्या युवराजने गुडघ्यावर बसून साजरा केलेला आनंद आणि सचिनने सामना जिंकल्यानंतर युवराजला मारलेली मिठी हे दोन क्षण आजही अनेकांच्या आठवणीमध्ये ताजे आहेत. या सामन्यात युवराजने ८७.५० च्या सरासरीने २४ चेंडूत २१ धावांची नाबाद खेळी केली होती.

विशेष म्हणजे या तिन्ही अंतिम सामन्यांमध्ये युवराजने ५० हून अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत. असा पराक्रम करणारा युवराज हा एकमेव खेळाडू आहे. दरम्यान आपल्या निवृत्तीच्या घोषणेमध्ये युवराजने अनेकांचे आभार मानले. सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, झहीर खान, आशिष नेहरा हे क्रिकेटविश्वातले आपले सोबती असल्याचे सांगताना सचिन माझा आदर्श होता, त्याच्यासोबत खेळायला मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यानं सांगितलं. दरम्यान, निवृत्तीचा निर्णय आपल्यासाठी कठीण होता. माझ्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे युवराज म्हणाला. या निवृत्तीनंतर मी स्थानिक टी-२० सामने खेळत राहणार आहे. या खेळातून मला जे काही मिळालंय ते आयुष्यभरासाठी माझ्यासोबत राहिल, आज जे काही मिळालं त्याबद्दल मला अभिमान असल्याचाही तो म्हणाला.