बंगळुरु : सौराष्ट्राने चमकदार कामगिरी करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत अखेरच्या पाचव्या दिवशी सौराष्ट्राने कर्नाटकचा चार गडी राखून पराभव केला. विजेतेपदासाठी त्यांची गाठ आता बंगालशी पडणार आहे.
सौराष्ट्राला अखेरच्या दिवशी विजयासाठी ११५ धावांची आवश्यकता होती. सौराष्ट्राने ६ बाद ११७ धावा काढून विजयावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी २०१९-२०च्या हंगामात सौराष्ट्राने विजेतेपद मिळविले होते. तेव्हादेखील त्यांची अंतिम लढत बंगालशीच झाली होती.

पहिल्या डावात आकर्षक द्विशतकी खेळी करून सौराष्ट्राची बाजू भक्कम करणाऱ्या कर्णधार अर्पित वसावडाने दुसऱ्या डावातही नाबाद ४७ धावांची निर्णायक खेळी केली. विजयासाठी ११५ धावांचे आव्हान दिल्यावर कर्नाटकच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना सौराष्ट्राला एकवेळ ५ बाद ४२ असे अडचणीत आणले होते. त्या वेळी पुन्हा एकदा वसावडाने कर्णधाराला साजेशी नाबाद खेळी करताना सौराष्ट्राचा विजय साकार केला.

संक्षिप्त धावफलक
कर्नाटक : ४०७ आणि २३४ (निकिन जोस १०९, मयांक अगरवाल ५५; चेतन सकारिया ४/४५, धर्मेद्रसिंह जडेजा ४/७९, पार्थ भूत २/५७) पराभूत वि. सौराष्ट्र : ५२७ आणि ३४.२ षटकांत ६ बाद ११७ (अर्पित नाबाद ४७; वासुकी कौशिक ३/३२)

बंगालचा दणदणीत विजय
इंदूर : दुसऱ्या उपांत्य लढतीत बंगालने गतविजेत्या मध्य प्रदेशाला ३०७ धावांनी पराभूत केले. चौथ्या दिवसअखेरच्या ९ बाद २७९ धावसंख्येवरून अखेरच्या दिवशी बंगालचा दुसरा डाव त्याच धावसंख्येवर संपुष्टात आला. विजयासाठी ५४८ धावांच्या आव्हानाचे दडपण मध्य प्रदेशाचे फलंदाज पेलू शकले नाहीत. त्यांचा डाव २४१ धावांत संपुष्टात आला.