सलग पाचव्यांदा रिझवी स्प्रिंगफिल्डला अजिंक्यपद
हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा
क्रिकेटच्या इतिहासात हजार धावांचा टप्पा गाठण्याचा योग हा नेहमीच दुर्मीळ मानला जातो. पण शालेय क्रिकेटजगतावर अधिराज्य गाजविणाऱ्या वांद्रे येथील रिझवी स्प्रिंगफिल्ड हायस्कूलने शुक्रवारी आणखी एक चमत्कार घडविला. गुरुवारी अरमान जाफरने ४७३ धावांची वैयक्तिक खेळी साकारून हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेटमध्ये उच्चांक नोंदविला होता. त्यानंतर शुक्रवारी रिझवीने ७ बाद १०४९ ही या मानाच्या स्पध्रेतील सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा पराक्रम केला. माटुंगा जिमखान्याच्या मैदानावर रिझवीच्या यशाने ऐतिहासिक विक्रमांचे पुनर्लेखन केले जात असताना या शाळेने सलग पाचव्यांदा विजेतेपदाचा मान संपादन केला.

शुक्रवारी अरमान (४७३) आणि सिद्धार्थ सिंग (१७७) यांच्या ६३१ धावांच्या भागीदारीनंतर शनिवारी उसामा पारकर (१०२) आणि पियुष नाथ (८९) यांनी चौफेर हल्लाबोल केला. त्यामुळे रिझवीला धावांचा एव्हरेस्ट निर्माण करता आला.
संक्षिप्त धावफलक
व्ही. एन. सुळे गुरुजी हायस्कूल (पहिला डाव) : ३५३
रिझवी स्प्रिंगफिल्ड हायस्कूल (पहिला डाव) : ७ बाद १०४९ (पृथ्वी शॉ ८१, सिद्धार्थ सिंग १७७, अरमान जाफर ४७३, उसामा पारकर १०२, पियुष नाथ ८९; हेरम परब ३/१७३)
     रिझवीच्या क्रिकेटमधील यशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सलग पाचव्यांदा हॅरिस शिल्ड जिंकणे, हे फार मोठे यश आहे. याचे श्रेय अर्थातच आमच्या गुणी खेळाडूंना जाते. विजयाची आणि पराक्रमाची ही भूक कधीच शमणार अशी मी आशा बाळगतो. उदयोन्मुख खेळाडूंना या स्पध्रेचे व्यासपीठ आगामी कामगिरीसाठी मिळत राहो!
डॉ. अख्तर हसन रिझवी, रिझवी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष
      गाइल्स शिल्ड क्रिकेट स्पध्रेत आम्ही उपांत्य फेरीत पराभूत झालो, तेव्हाच हॅरिस शिल्ड यंदा गमवायची नाही, ही खूणगाठ बांधली. सलग पाचवे हॅरिस शिल्डचे अजिंक्यपद हे अद्वितीय यश आहे. यशाची ही परंपरा आम्ही अशी राखू!
राजू पाठक, रिझवीचे प्रशिक्षक