बोक्साम बॉक्सिंग स्पर्धा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहा वेळा जगज्जेतेपद पटकावणारी मेरी कोम तसेच आशियाई सुवर्णपदक विजेता अमित पांघल यांच्यासह भारताच्या १२ बॉक्सिंगपटूंनी एकही लढत न खेळता बोक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पदकापासून ते फक्त एक विजय दूर आहेत.

भारताचे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले नऊ तसेच अन्य पाच बॉक्सिंगपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर मेरी कोम (५१ किलो) पहिल्यांदाच रिंगणात उतरत आहे. तिला सलामीच्या लढतीत इटलीच्या जिओर्डना सोरेन्टिनो हिच्याशी लढत द्यावी लागेल.

पांघलला (५२ किलो) सलामीच्या लढतीत पुढे चाल मिळाली असून त्याची उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या गॅब्रियल इस्कोबारशी गाठ पडणार आहे. विकास कृष्णन (६९ किलो) याला उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या विन्सेन्झो मँगीआकॅप्रे याचा सामना करावा लागेल.

आशीष कुमार (७५ किलो) आणि सुमित संगवान (८१ किलो) हे उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी बंदी भोगलेले बॉक्सिंगपटू पुनरागमन करत असून सतीश कुमार (९१ किलोवरील) व संजित (९१ किलो) यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली.

महिलांमध्ये जास्मिन आणि मनीषा (५७ किलो) यांच्यासह सिमरनजीत कौर (६० किलो), पूजा राणी (७५ किलो) आणि लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो) यांनीही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 indian boxers advance to semifinals abn
First published on: 03-03-2021 at 00:36 IST