भारताची १७ वर्षीय बॅटमिंटनपटू उन्नती हुड्डाने मोठा उलटफेर केला आहे. उन्नती हुड्डाने ३० वर्षीय अनुभवी महिला बॅडमिंटनपटू आणि डबल ओलिम्पिक मेडलिस्ट पीव्ही सिंधूला पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे. सध्या चीनमध्ये बीडब्ल्यूएफ सुपर १००० चायना ओपन २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील उपउपांत्य फेरीतील सामन्यात पीव्ही सिंधू आणि उन्नती हूड्डा हे दोन्ही खेळाडू आमनेसामने आले होते.
उन्नती हुड्डाचा पीव्ही सिंधूवर विजय
या स्पर्धेतील महिलांच्या राऊंड ऑफ १५ च्या सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू आमनेसामने आले होते. पीव्ही सिंधू आणि उन्नती हुड्डा या दोघांमध्येही रोमांचक लढत पाहायला मिळाली. मात्र शेवटी पीव्ही सिंधूला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना उन्नतीने २१-१९, १९-२१, २१-१३ ने आपल्या नावावर केला. या दमदार विजयासह उन्नतीने या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे पीव्ही सिंधूचा या स्पर्धेतील प्रवास इथेच समाप्त झाला आहे.
सामन्यात नेमकं काय घडलं?
या सामन्यात उन्नतीचं वर्चस्व पाहायला मिळालं. तिने पहिल्या सेटमध्ये दमदार खेळ करत २१-१९ ने बाजी मारली. पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये पीव्ही सिंधूने दमदार पुनरागमन केलं. तिने हा सेट २१-१९ ने आपल्या नावावर केला. त्यामुळे तिसरा सेट हा निर्णायक होता. या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. पण उन्नतीसमोर पीव्ही सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला. तिने हा सेट २१-१३ ने आपल्या नावावर केला.
पीव्ही सिंधूचा या स्पर्धेतील प्रवास इथेच संपला आहे. आता भारतीयांचं लक्ष उन्नती हुड्डावर असणार आहे. उन्नती हुड्डाने या स्पर्धेतील राऊंड ऑफ ३२ फेरीत ख्रिस्टी गिल्मरला ३६ मिनिटात पराभूत केलं होतं. तिने हा सामना २१-११, २१-१६ ने आपल्या नावावर केला होता. तर पीव्ही सिंधूने राऊंड ऑफ ३२ फेरीत जगातील आठव्या क्रमांकाची खेळाडू जपानच्या तोमोका मियाजाकीवर २१-१५,८-२१, २१-१७ ने दमदार विजय मिळवत राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला होता.