कबड्डीच्या सामन्यात गुणांवरुन झालेल्या वादात १८ वर्षीय खेळाडूवर गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अविनाश असं या खेळाडूचं नाव असून, हा प्रकार घडल्यानंतर उपस्थितांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. वेळेतच उपचार झाल्यामुळे सध्या अविनाशची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामना संपल्यानंतर अविनाशचा पंचांनी दिलेल्या गुणांवरुन प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंसोबत वाद सुरु होता. काहीवेळाने या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी स्थानिकांनी मध्यस्थी करत हा प्रकार थांबवला. यानंतर दोन अज्ञात व्यक्ती मैदानात आल्या आणि त्यांनी अविनाशच्या दिशेने गोळी झाडत काही क्षणांमध्येच तिकडून पोबारा केला. सुदैवाने गोळी अविनाशच्या डोक्याला चाटून गेल्याने त्याच्या जीवाला धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

दिल्लीच्या दक्षिणपुरी परिसरात दोन कॉलनींच्या संघामध्ये हा सामना खेळवला जात होता. जिल्हा पातळीचा खेळाडू असलेला अविनाश हा ‘C Block’ संघाचं नेतृत्व करत होता. संपूर्ण सामन्यात पंचांच्या निर्णयावर अविनाश आपली नाराजी व्यक्त करत होता. याच कारणामुळे त्याच्यावर हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळी झाडणाऱ्यांची ओळख पटली असून, त्या दोघांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही व्यक्तींविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.