वसई-विरार महानगरपालिका आणि वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या मान्यतेने २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वसई-विरार महापौर मॅरेथॉन शर्यतीतील विजेत्यांना २० लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. पुरुष आणि महिला गटातील विजेत्यांना दोन लाखांचे इनाम देण्यात येईल. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील विजेत्यांना अनुक्रमे एक लाख दहा हजार आणि साठ हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. अर्धमॅरेथॉन शर्यतीतील विजेत्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात येईल.
पूर्ण आणि अर्धमॅरेथॉन शर्यतीत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना ‘टायमिंग चिप’ अनिवार्य असणार आहे. या शर्यतीत वसई, ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि अन्य जिल्ह्य़ांतील हौशी आणि व्यावसायिक धावपटू सहभागी होणार आहेत. या शर्यतीला राष्ट्रीय दर्जा लाभला असून  ‘मुली वाचवा, निसर्ग समतोल राखा,’ असा संदेश या शर्यतीद्वारे देण्यात येणार आहे. शर्यतीसाठी अर्ज भरण्याची
शेवटची तारीख १० ऑक्टोबर असणार आहे.