scorecardresearch

स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू; ३८ जखमी

ओम्बेले स्टेडियमची प्रेक्षकक्षमता ६० हजार इतकी असून करोना साथीच्या पार्श्वभूमीवर ८० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार होता.

एपी, याऊंडे (कॅमेरून)

आफ्रिकन चषक फुटबॉल स्पर्धेतील कॅमेरून विरुद्ध कोमोरोस यांच्यातील सामन्यादरम्यान ओलेम्बे स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत आठ चाहत्यांचा मृत्यू झाला, तर एकूण ३८ जण जखमी झाले आहेत.

सोमवारी मध्यरात्री झालेल्या या लढतीत कॅमेरूनने २-१ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. परंतु त्यांचा खेळ पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड उडाल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांना आवरणे कठीण गेले. ओम्बेले स्टेडियमची प्रेक्षकक्षमता ६० हजार इतकी असून करोना साथीच्या पार्श्वभूमीवर ८० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार होता.

सामना सुरू झाल्यानंतरही स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अजाणतेपणी बंद असलेल्या प्रवेशद्वाराच्या दिशेने पाठवले. त्यामुळे तेथे घोळका जमल्यानंतर काही मिनिटांच्या अवधीने प्रवेशद्वार खुला करण्यात आला. मात्र तोपर्यंत चाहत्यांच्या प्रतीक्षेचा बांध फुटल्यामुळे त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्का देत आतमध्ये धाव घेतली. यादरम्यान अनेक जण इतरांचा धक्का लागून अथवा तोल जाऊन खाली पडले आणि त्यानंतर चेंगराचेंगरीला प्रारंभ झाल्याचे एका चाहत्याने सांगितले.

मंगळवारी सायंकाळपर्यंत एकूण आठ जणांचा या दरम्यान मृत्यू झाल्याचे समजले असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. एकंदर ५०हून अधिक जणांना जवळील मेसासी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये काही बालकांचाही समावेश आहे. सदर घटनेसंबंधी कॅमेरूनचे राष्ट्राध्यक्ष पॉल बिया यांनी चौकशीचे आदेश दिले असून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. दरम्यान, यापूर्वीही फुटबॉलमध्ये चेंगराचेंगरीचे तसेच प्रेक्षकांच्या उद्रेकाचे असंख्य प्रसंग घडले असून २०१२मध्ये इजिप्तमधील एका स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्ध्यामधील लढतीत ७४ चाहत्यांचा मृत्यू झाला, तर ५०० जण जखमी झाले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 8 killed 38 injured in stampede outside football stadium in cameroon zws

ताज्या बातम्या