कृषी , सहकार , उद्योग, कला याच्या जोडीनेच विविध क्षेत्रांत अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूरची क्रीडा परंपरा अतिशय उज्वल आहे. कुस्ती पंढरी हि करवीरच्या आणखी एक ओळख. साऱ्या भारतात येथील लाल मातीवरची प्रसिध्द आहे. हि परंपरा चालवणारे अनेक तारे चमकले, त्यातील एक तेजस्वी नाव म्हणजे ‘रुस्तम-ए-हिंद’ दादू चौगुले. पाच-सहा दशकांपूर्वी दादू चौगुले हे नाव मल्ल जगतात भलतेच दुमदुमत होते. शक्तिमान, बलदंड दादू चौगुले यांचा हात धरणारा दुसरा मल्ल त्याकाळात दिसत नव्हता.
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागातील अर्जुनवाडा हे दादू चौगुले यांचे गाव. जन्म १९४८ सालचा. गावात दूधदुभतं विपुल. शेतीवाडी, जित्राबं मायंदाळ असल्याने खाण्यापिण्याची चंगळ. शिवाय, गावात एक नियम केलेला. कोणीही गवळ्याला दूध विकायचे नाही. त्यामुळे सारं दूध , तूप , लोणी बालगोपाळांचा मुखात. खानपानाने तगडी बनलेली शंभरभर मुलं कुस्तीच्या आखाड्यात रग मुरवयाची.
त्यातील १० -१२ वर्षाचा दादू सर्वाना भारी ठरायचा. गावातल्याच नव्हे तर पंचक्रोशीतल्या सामवयस्कांना त्याने आस्मान दाखवलेले. त्याचे मल्ल कौशल्य पाहून कुस्ती खेळलेल्या त्याच्या वडिलांनी त्याला कोल्हापूरला नेण्याचे ठरवले. पुरातन काळापासून चालत आलेली एक विद्या म्हणजे मल्लविद्या. यात त्याचा हात धरणारा कोणी नसला पाहिजे, असा त्यांचा ध्यास. ‘माझा दादू मोठा पैलवान झाला पाहिजे, त्यासाठी माझी काहीही करायची तयारी आहे’ असे दत्तात्रय चौगुले सर्वाना सांगत सांगायचे. ते केवळ सांगून थांबले नाही तर आपल्या पोराने नाव काढावे यासाठी अहोरात्र खपत राहिले.
कोल्हापूर हे महाराष्ट्रातील मैदानी खेळासाठी प्रसिद्ध असे ठिकाण. कुस्तीची पंढरी. कोल्हापूरचा कुस्तीचा वारसा खूप जुना. पेहलवान म्हटले की कोल्हापूरचाच असं म्हटलं जाते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी मल्लविद्या जोपासण्याचे कार्य आत्मीयतेनं करवीर नगरीत केले. अशा या नगरीतील मोतीबाग तालमीत दादू पंधराव्या वर्षी दाखल झाला. भीमकाय, निरोगी शरीरयष्टीच्या दादूचे मल्ल कौशल्य त्यांचे गुरु, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांनी यांनी हेरले. ख्यातनाम मल्ल आणि वस्ताद असा दुहेरी पातळीवरील त्यांची कामगिरी विशेष मानावी लागेल. कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमितील वस्तादांची परंपरा आंदळकर यांनी पुढे नेटाने चालवली. कुस्तीत अजूनही गुरु – शिष्य परंपरा जोपासली जात आहे. बलदंड शरीराचा दादू येथे अल्पावधीतच पारंगत झाला. पहाटेपासून कसून सराव केला जावू लागला. जोर , बैठक , धावणे , दोर चढणे … असा व्यायाम करताना दिवसही अपुरा पडू लागला. लवकरच दादुच्या शड्डूचा आवाज राज्यात -देशभर ऐकू येऊ लागला.
१९७० सालापासून दादू चोगुले हे नाव सर्वोत्मुखी झाले.येथूनच कारकीर्द बहरत गेली. त्याची सुरुवात झाली ती कुस्ती क्षेत्रात मानदंड समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’,पासून. परशुराम पाटील यांना सतराव्या मिनिटाला घुटना डावावर पराभूत केले. पुढच्याच वर्षी अलिबाग येथे साहेबराव जाधव यांस पंधराव्या मिनिटाला लपेट डावावर लपेटले आणि कुस्ती रसिकांनी दादूंना डोक्यावर घेतले. खचाखच भरलेल्या मैदानात कोल्हापुरी फेटे उडविले गेले. ‘१९७३ साली तर दादू चौगुले या नावाचा डंका आणखी वाढला. याला कारण ठरले ते ‘रुस्तम-ए-हिंद’ या किताबासाठी झालेली कुस्ती. खडाखडी सुरु होण्याचा अवकाश दादुंनी विजेच्या चपळाईने टांग टाकून दीनानाथसिंग यांना अवघ्या एका मिनिटात चितपट केले पाठोपाठ ‘महान भारत केसरी’ या मानाच्या स्पर्धेची चित्तथरारक लढत दादूंनी जिंकली. ढाक डाव टाकत दिल्लीच्या नेत्रपाल यांना पराभूत करून मानाची गदा प्राप्त केली. जलद कुस्ती करणारा मल्ल अशी त्यांची ओळख दृढ होत गेली. वर्षाकाठी ५-६ मोठ्या मल्लांना आस्मान दाखवणारा तगडा मल्ल कुस्तीक्षेत्राचे आकर्षण न बनला तर नवल !
आता या वज्रदेही मल्लास देशाच्या सीमा अपुऱ्या ठरू लागल्या. विदेशातही जावे, तिथल्या मल्लांशी मल्लयुद्ध खेळावे असा ध्यास त्यांनी धरला. पण, असे करणे सोपे नव्हते. कारण आजवर दादूंनी लालमातीत कुस्ती केलेली. परदेशात कुस्ती करायची तर मॅटचा सराव महत्वाचा. तशी सोय त्याकाळी महाराष्ट्रात नव्हती. उत्तरेत जाणे गरजेचे होते. त्यावर त्यांनी पतियाळा येथे सराव सुरु ठेवला. १९७३ साली ऑकलंड या न्यूझीलंडच्या राजधानीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १०० किलो वजन गटात फ्री स्टाइल प्रकारासाठी त्यांची निवड झालेली. पण, दादूंचे वजन १२० किलो. तेव्हा पहिले काम म्हणजे वजन कमी करणे. त्यासाठी अहोरात्र घाम गाळला. सतपाल , करार , चिंगळे अशा मल्लासोबत सराव सुरु ठेवला. हि सारी मंडळी राष्ट्रकुल स्पर्धेत उतरली. दादू चौगुले यांनी पूर्वानुभव नसतानाही केवळ कुस्तीकौशल्यावर रौप्यपदक पटकावले.
‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी विख्यात अभिनेता आमीर खान याने कोल्हापुरात जाण्याचा निर्णय घेतला होता. हिंदकेसरी दादू चौगुले मार्गदर्शन करत असलेल्या मोतीबाग तालमीला त्याने प्राधान्य दिले. तेव्हा हि तालीम चर्चेत आली . पण, यानिमित्ताने दोन वेगवगेळ्या क्षेत्रातील लोकांचे भावबंध जुळले. एक तोंडाला कधीही पावडर न लावणारा आणि दुसरा रंगसफेदी करून कॅमेर्यापुढे जाणारा …असे भिन्न प्रकृती-प्रवृत्तीचे मनुष्य एकत्र आले, पण त्यांचे मैत्र कायमचे जुळले आहे. दादुमामांना सतपाल बरोबरच्या कुस्तीत यश आले नाही पण कित्येक दशके संवाद आणि आपुलकीचे नाते कायम आहे. वडिलांची कुस्ती परंपरा आपण चालवली, आपली परंपरा पोरांनी चालवली पाहिजे हा दादुमामांचा आग्रह. खर तर दंडकच. साहजिकच, त्यांनी विनोद आणि अमोल या मुलांना मोतीबाग तालमीत सामावून घेतले. विनोदने ‘हिंदकेसरी’ किताबाची गदा मिळवून मामांच्या परंपरेत भर घातली. दादूंच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीचं मोठं नुकसान झालंय यात काही शंकाच नाही.