Ab Devilliers Century: इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील १२ वा सामना दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स आणि ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघातील विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सने सार्थ ठरवला. या सामन्यात त्याने दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स संघातील गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या डावात त्याने ३९ चेंडूंत आपलं शतक पूर्ण केलं.

ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४६ चेंडूंचा सामना करत १२३ धावांची वादळी खेळी केली. या स्पर्धेतील हे त्याचं दुसरं शतक ठरलं आहे. आपल्या खेळीदरम्यान त्याने १५ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार मारले. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने डार्सी शॉर्टच्या षटकात लागोपाठ ३ चौकार मारले. यासह त्याने आपलं शतक पूर्ण केलं. पण पिटर सिडलच्या षटकात त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं.

पण ज्यावेळी तो बाद झाला त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने १३ व्या षटकात १८७ धावांचा डोंगर उभारला होता. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची फलंदाजी पाहून असं वाटलं होतं की, दक्षिण आफ्रिकेचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकतो. पण दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाला ६ गडी बाद २४१ धावा करता आल्या. जोपर्यंत एबी डिविलियर्स फलंदाजी करत होता. तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज वाऱ्याच्या वेगाने धावा करत होते. पण तो बाद झाल्यानंतर धावांची गती कमी झाली. तो बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाला केवळ ५४ धावा जोडता आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही एबी डिविलियर्सची शतक झळकावण्याची पहिलीच वेळ नाही. याआधी इंग्लंड चॅम्पियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४१ चेंडूत शतक झळकावलं होतं. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. आतापर्यंत त्याने ३०३ धावा केल्या आहेत.