तुषार वैती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी क्रिकेट आणि फुटबॉलनंतर आता देशाच्या बॉक्सिंगच्या रिंगणात उडी घेतल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन वेळा पुढे ढकलण्यात आलेली भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या (बीएफआय) अध्यक्षपदाची निवडणूक आता ३ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. या निवडणुकीत शेलार यांच्यासमोर अभय सिंग यांचे कडवे आव्हान असल्यामुळे शेलार हा चक्रव्यूह भेदणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा असलेल्या बॉक्सिंगसारख्या खेळावर उत्तरेकडील लॉबीचे पूर्ण वर्चस्व आहे. चार वर्षांपूर्वी बॉक्सिंगमध्ये पदार्पण करणाऱ्या अजय सिंग यांनी आपल्या कार्याने या उत्तरेकडील लॉबीचे मन जिंकले आहे. त्याचबरोबर उत्तराखंडच्या अजय यांना आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये छाप पाडणाऱ्या ईशान्येकडील राज्यांचे समर्थनही मिळणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक जिंकणे शेलार यांच्यासाठी सोपे नसेल.

भाजपच्या राष्ट्रीय कोअर समितीत स्थान मिळवणाऱ्या शेलार यांचे हरयाणा, दिल्ली आणि पंजाब या बॉक्सिंगमधील वरचढ असलेल्या राज्यांच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. भारतीय बॉक्सिंगमधील चाणक्य समजले जाणारे विद्यमान सरचिटणीस जय कवळी हे शेलार यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्यामुळे अध्यक्षपदाची माळ महाराष्ट्राच्या गळ्यात पडणार, हे निश्चित मानले जात आहे.

‘बीएफआय’च्या निवडणुकीत संलग्न ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार आहेत. चार वर्षांंपूर्वी झालेल्या निवडणुकीत अजय यांना अध्यक्षपदी विराजमान करण्यासाठी कवळी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्यामुळे ६४ पैकी अधिकाधिक मते शेलार यांच्या पारडय़ात टाकण्यासाठी कवळी यांनी कंबर कसली आहे.

‘‘राज्याचे माजी क्रीडामंत्री, क्रिकेट आणि फुटबॉलमधील नामांकितांशी असलेले चांगले संबंध तसेच क्रीडा प्रशासनाचा दांडगा अनुभव यामुळे शेलार यांच्याकडून बॉक्सर्सच्या खूप अपेक्षा आहेत. शेलार हे बॉक्सिंग या खेळाला नव्या उंचीवर नेऊन ठेवतील, असा विश्वास असल्यानेच त्यांना आम्ही बॉक्सिंगच्या रिंगणात उतरवले आहे,’’ असे जय कवळी यांनी सांगितले.

बॉक्सिंगमध्ये देशाला पदक मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करणारे खेळाडू आता अर्थार्जनाचा विचार करू लागले आहेत. त्यामुळे फक्त पदक मिळवणे हे एकमेव उद्दिष्ट खेळाडूंचे राहिले नाही. त्यामुळे विविध राज्यांच्या संघटना आणि खेळाडूही शेलार यांच्या पाठीशी असल्याचे समजते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhay singh challenges shelar for boxing federation of india presidential election abn
First published on: 30-01-2021 at 00:09 IST