ग्रँडमास्टर व माजी कनिष्ठ विश्वविजेता अभिजित गुप्ता याने अलऐन क्लासिक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले.
स्पर्धेच्या विजेतेपदाचा मुख्य दावेदार असलेला अग्रमानांकित बेदूर जोबावा हा शेवटच्या फेरीच्या लढतीस नियोजित वेळेस उपस्थित राहिला नाही. त्यामुळे त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या गुप्तास पूर्ण गुण बहाल करण्यात आला. गुप्ताने नऊ        फेऱ्यांमध्ये साडेसात गुण मिळविले. त्याच्याबरोबरच वासिफ दारार्बियेली (अजहरबैजान) व मार्टिन क्रॅव्हित्सिव्ह (जॉर्जिया) यांचेही साडेसात गुण झाले मात्र टायब्रेकर गुणांच्या आधारे गुप्तास अजिंक्यपद देण्यात आले. त्याने आठव्या फेरीत लिथुवेनियाचा ग्रँडमास्टर अलोयाझ क्वेनिस याच्यावर उल्लेखनीय विजय मिळविला.
मुलांच्या आठ वर्षांखालील गटात भारताच्या आर. प्रज्ञानंदाह याने अकरा फेऱ्यांमध्ये अकरा गुण मिळवीत विजेतेपदासह निर्विवाद वर्चस्व गाजविले. १६ वर्षांखालील गटात मुरली कार्तिकेयन व गिरीश कौशिक यांनी नऊ फे ऱ्यांमध्ये नऊ गुण मिळविले. टायब्रेकर गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळाले. १२ वर्षांखालील मुलांमध्ये के.रघुनंदन याने रौप्यपदक तर १८ वर्षांखालील गटात वैभव सुरी याला कांस्यपदक मिळाले.
१० वर्षांखालील मुलींमध्ये भारताच्या सायना सलोनिका हिला सुवर्ण तर सी. लक्ष्मी हिला कांस्यपदक मिळाले. ८ वर्षांखालील मुलींमध्ये भाग्यश्री पाटील हिला कांस्यपदक मिळाले. भारतीय संघास सर्वोत्तम संघ म्हणून विशेष पारितोषिक देण्यात आले.