Abhimanyu Easwaran Father Reaction on Son Never Ending Wait: भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळाली. पण या मालिकेतही तो भारताकडून पदार्पण करू शकला नाही, पाचही सामने तो बाकावरच बसून राहिला. ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतही त्याची निवड केली होती पण खेळण्याची संधी मिळाली नाही. यावर आता त्याच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी करणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनला गेली ३ वर्षे भारताकडून पदार्पणाची वाट पाहावी लागत आहे. त्याची संघात निवड होतेय पण पदार्पणाची संधी मात्र त्याला मिळत नाहीये. अभिमन्यूसमोर १५ हून अधिक खेळाडूंनी पदार्पण केलं आहे, पण त्याची प्रतीक्षा संपत नाहीये. मुलाकडे सततच्या दुर्लक्षामुळे वडीलही दुःखी आहेत.
अभिमन्यू ईश्वरनच्या वडिलांची भावुक प्रतिक्रिया
अभिमन्यू ईश्वरनच्या वडिलांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, “मी अभिमन्यूच्या कसोटी पदार्पणासाठी दिवस नाही तर वर्षे मोजत आहे. आतापर्यंत तीन वर्षे झाली आहेत. खेळाडूचे काम काय असतं? हेच की त्याला धावा करायच्या असतात. अभिमन्यूनेही ते करूनही दाखवून दिलं आहे.”
“लोक म्हणतात की गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इंडिया-अ संघाकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली नव्हती आणि त्यामुळे त्याला संधी मिळाली नाही. चला मी हे मान्य करतो. बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी अभिमन्यूने धावा केल्या तेव्हा करुण नायर संघात नव्हता. करुणची दुलीप ट्रॉफी आणि इराणी कपसाठीही निवड झाली नव्हती”, असं त्याचे वडिल रंगनाथन इश्वरन म्हणाले.
करूण नायरचं नाव घेत करूण नायरचे वडिल काय म्हणाले?
“अभिमन्यूने गेल्या वर्षापासून आतापर्यंत जवळपास ८६४ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत ते कशी तुलना करतात? मला समजत नाही. त्यांनी करुण नायरला संधी दिली. ते ठीक आहे, कारण त्याने ८०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला. माझा मुलगा नैराश्यात आहे असं दिसतंय, पण हे होणारच होतं. काही खेळाडू त्यांच्या आयपीएल कामगिरीच्या आधारे कसोटी संघात स्थान मिळवतात. रणजी, इराणी आणि दुलीप ट्रॉफीमधील प्रदर्शनाच्या आधारे संघात निवड झाली पाहिजे”, असं मत त्याच्या वडिलांचं आहे.
“मला तर कळतंच नाहीये की त्याला पदार्पणाची संधी का मिळत नाही. आता खूप वेळ झाला आहे. अभिमन्यू चांगला आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. टीम मॅनेजमेंटला त्याच्यावर फारसा विश्वास आहे असं दिसत नाहीये.” अभिमन्यू ईश्वरनच्या वडिलांनी भावुक प्रतिक्रिया देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.