Asia Cup 2025 India Squad Shreyas Iyer Snub Reactions: आशिया चषक २०२५साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयपीएल आणि देशांतर्गत शानदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला या संघात स्थान मिळालेलं नाही. याहून महत्त्वाचं म्हणजे अय्यरचा राखीव खेळाडूंमध्येही समावेश नाही. अय्यरची निवड न झाल्यानंतर सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. अनेक जण यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान माजी भारतीय सहाय्यक प्रशिक्षकांनी यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
श्रेयस अय्यरला भारताच्या आशिया चषक संघात संधी न मिळाल्याने चाहते टीम इंडियाच्या निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका करत आहेत. अय्यरचे चाहतेच नाही तर टीम इंडियाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे.
आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर, अभिषेक नायर स्टार स्पोर्ट्स शोमध्ये संघाबाबत चर्चा करताना दिसले. तिथे त्यांनी अय्यरला संघात स्थान न मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. त्याने टीम इंडियाला हा प्रश्न विचारला की जर अय्यर इतका चांगला खेळाडू आहे, तर तो १५ खेळाडू तर सोडाच, उर्वरित पाच राखीव खेळाडूंच्या यादीत का नाही?
श्रेयस अय्यरला आशिया चषक संघात संधी न मिळल्याने चाहत्यांची टीका
अभिषेक नायर म्हणाला, “जर तो संघात असण्याइतका चांगला खेळाडू होता तर तो राखीव खेळाडूंमध्ये का नाही? निवड बैठकीत अनेकदा रोचक मुद्द्यांवर चर्चा होतात, पण मला समजत नाही की श्रेयस अय्यरला २० खेळाडूंच्या स्क्वॉडमध्येही का स्थान मिळालं नाही. मी १५ खेळाडूंबद्दल बोलत नाहीये तर २० खेळाडूंबद्दल बोलतोय. हा श्रेयस अय्यरसाठी सरळ मेसेज आहे की तू २० खेळाडूंमध्येही नाहीस. तू संघात असणार नाहीस. एकतर रियान पराग संघात येईल किंवा दुसरा कोणीतरी येईल.”
अभिषेक नायर पुढे म्हणाला, “टीम इंडियाचे निवडकर्ते त्याच्याकडे टी-२० फॉरमॅटमधील खेळाडू म्हणून पाहत नसतील असं असू शकतं. कदाचित श्रेयस अय्यर इतरांइतका निवडकर्त्यांपैकी कोणाला तरी आवडत नसावा.” अभिषेक नायर हा गौतम गंभीरचा माजी सहकारी राहिला आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत टीम इंडियाचा सहाय्यक प्रशिक्षकही होता. त्यामुळे त्याच्या अनुभवाववरून त्याने हे विधान केलं असल्याची शक्यता चाहते वर्तवत आहेत.
श्रेयस अय्यर गेल्या दोन वर्षांपासून चांगली कामगिरी करत आहे पण तरीही, हा खेळाडू फक्त एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळत आहे. अय्यरने भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामना ३ डिसेंबर २०२३ रोजी खेळला होता आणि त्यानंतर त्याची संघात निवड झालेली नाही. अय्यरने भारतासाठी ४७ टी-२० डावांमध्ये ११०४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ८ अर्धशतकं केली आहेत.