अफगाणिस्तानचा मिक्स मार्शल आर्ट्सचा स्टार खेळाडू अब्दुल अझीम बदक्षी याने २४ जून रोजी नवी दिल्ली येथे मॅट्रिक्स फाईट नाईट ९ मध्ये भारतीय खेळाडू श्रीकांत शेखर याच्यावर रिंगबाहेर क्रूर हल्ला केला. इतर दुखापतींसह जबडा तुटल्यानंतर श्रीकांतला राजधानी दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर अब्दुल भारताबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच अब्दुलबद्दल धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

यानंतर अभिनेता आणि मिक्स मार्शल आर्ट्सचा सूत्रसंचालक परविन डबास यांनी दावा केला की अफगाणिस्तानच्या अब्दुल बदक्षीकडे एक अफगाणिस्तानचा आणि दुसरा भारतीय असे दोन पासपोर्ट आहेत. तसेच त्याच्या नावावर एक आधार कार्ड देखील आहे. श्रीकांतवरील हल्ल्याचे तपशील समोर आल्यानंतर अब्दुल बदक्षी हा भारतातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा डबास यांनी केला आहे.

परवीन डबासने अब्दुल बदक्षीच्या कथित भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्डचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यामध्ये अब्दुलचे नाव हे अजीम सेठी आहे. “अफगाण एमएमए फायटर अब्दुल अझीम बदक्षी याच्याकडे अफगाणी आणि भारतीय असे दोन पासपोर्ट आहेत आणि त्याने आधार कार्ड बनवले आहे. (कसे ते देवालाच माहिती) तो आज रात्री पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप दिल्ली पोलिसांद्वारे एफआयआर दाखल केली आहे की नाही याची खात्री नाही,” असे परवीन डबास यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच या क्रूर हल्ल्यानंतर श्रीकांतने अब्दुल बदक्षीविरुद्ध एफआयआर दाखल केल्याचा दावा डबास यांनी केला आहे.

प्रो बॉक्सर नीरज गोयतने देखील पोलिस अधिकाऱ्यांना अब्दुल बदक्षीला अटक करण्याचे आवाहन केले आहे. तसेच गोयतने श्रीकांतच्या वैद्यकीय अहवालाचे फोटो देखील शेअर केले आहेत ज्यामध्ये त्याचा जबडा तुटलेला दिसत आहे. भारतीय खेळाडूवरील हल्ल्यानंतर मॅट्रिक्स फाईट नाईट प्रमोशनने अफगाणिस्तानातील खेळाडूंवर बंदी घातली आहे.

अब्दुल अझीम बदक्षी हा मिक्स मार्शल आर्ट्सचा मोठा खेळाडू आहे आणि त्याच्या नावावर १३-४ असा रेकॉर्ड आहे. ई टाईम्सच्या वृत्तानुसार शुक्रवारी नवी दिल्लीत जमावाने श्रीकांतवर हल्ला केला. या जमावाच्या हल्ल्यातील मुख्य आरोपी हा अब्दुल असल्याचे बोलले जात आहे. अब्दुल हा जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा हीचा बॉयफ्रेन्ड असल्याची चर्चा आहे. हा कार्यक्रम जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफ यांनी आयोजित केला होता. . तिथे श्रीकांत शेखरवर ५० लोकांच्या जमावाने हल्ला केला.

श्रीकांत शेखरचा सहकारी सेठ रोझारियोशी लढत असलेल्या झहोर शाहला प्रोत्साहित करण्यासाठी अझीम बदक्षी दिल्लीत आला होता. श्रीकांत शेखरने दावा केला की अफगाण चाहत्यांनी त्याच्यावर बाटल्या फेकल्या आणि अब्दुल अझीम बदक्षीने त्याला धक्काबुक्की केली. “सेठ लढत असताना मी त्याच्या नावाने ओरडत होतो. त्यावेळी कोणीतरी माझ्याकडे कागदाचा कचरा किंवा प्लास्टिक फेकले आणि मधली बोटे दाखवत माझी चेष्टा केली,” असे श्रीकांतने लॉकर रूमला सांगितले.

“मला यावर राग आला आणि मी त्यांना प्रत्युत्तर दिले. तेव्हा एका अधिकाऱ्याने माझा हात पकडला आणि म्हणाला की, इथून निघून जा, हा जमाव तुझ्यावर रागावला आहे. तो मला रिंगसाइडच्या बाहेर घेऊन जाऊ लागला. मी त्याच्याबरोबर बाहेर जात होतो आणि मला पाठीमागून अब्दुल बदक्षीने धक्काबुक्की केली. मी त्याला येताना देखील पाहिले नाही आणि तो कुठे आहे हे मला माहित नव्हते. त्याने मला दोनदा मारले आणि मी खाली पडलो. मी जमिनीवर असताना, अधिकाऱ्यांनी त्याला ढकलून दिले आणि मला वाचवण्याचा प्रयत्न केला. मग जमावाने मला मारहाण करण्यास सुरुवात केली,” असेही श्रीकांतने सांगितले.