ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याला विराट कोहलीच्या आरसीबी संघानं १४ कोटी २५ लाख रुपयांच्या किंमतीमध्ये खरेदी केलं आहे. पंजाब संघानं लिलावाआधी मॅक्सवेलला करारमुक्त केलं होतं. मॅक्सवेल पहिल्यांदाच आरसीबीच्या संघाकडून खेळताना दिसेल. विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स यांच्यासह आता विस्फोटक फलंदाज मॅक्सवेलही आरसीबीच्या चमूमध्ये जोडला आहे.

मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी धोनीच्या चेन्नई आणि विराटच्या आरसीबीमध्ये स्पर्धे लागली होती. मात्र, अखेर आरसीबीनं १४ कोटी २५ लाख रुपये खर्च करत मॅक्सवेलला खरेदी केलं आहे. ग्लेन मॅक्सवेलनं ८२ आयपीएल सामन्यात सहा अर्धशतकासह १,५०५ धावा चोपल्या आहेत. ९५ धावांची सर्वोत्कृष्ट खेळी आहे.

मॅक्सवेलची मूळ किंमत दोन कोटी रुपये होती. पण लिलावात चेन्नई आणि आरसीबीनं मॅक्सवेलला आपल्या संघात घेण्यासाठी रस दाखवला. अखेर १४ कोटी २५ लाख रुपयांना आरसीबीनं खरेदी केलं. कदाचीत यंदाच्या आयपीएलमधील मॅक्सवेल सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो.

आयपीएलच्या लिलावापूर्वी मॅक्सवेलनं आरसीबीमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. डिव्हिलिअर्स आणि विराट कोहलीसोबत खेळण्याचा आनंद घ्यायचा असल्याचेही त्यानं म्हटलं होतं.