भारताच्या कोनेरू हम्पी व द्रोणावली हरिका यांनी जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्याच्या आशा कायम राखल्या. त्यांनी अनुक्रमे रशियाच्या अ‍ॅलिसा गॅलियामोवा व अ‍ॅलेक्झांड्रा कोस्टेंचुक यांच्याविरुद्धचा पहिला डाव जिंकला.
अग्रमानांकित हम्पीने लागोपाठ पाचवा विजय नोंदविताना सर्वोत्तम खेळाचा प्रत्यय घडविला व ३८ व्या चालीत डाव जिंकला. तिने पांढऱ्या मोहऱ्यांनी सुरुवात करताना स्लाव्ह डिफेन्स तंत्राचा उपयोग केला. दुसऱ्या डावात तिला काळय़ा मोहरांनी खेळायचे असल्यामुळे तो डाव बरोबरीत ठेवण्यावरच तिचा भर राहील. या तुलनेत हरिकाला माजी विश्वविजेती खेळाडू अ‍ॅलेक्झांड्रा हिच्याविरुद्ध विजय मिळविताना झगडावे लागले. तिने काळय़ा मोहरांनी खेळतानाही डावाच्या शेवटच्या टप्प्यात सुरेख डावपेच रचून विजयश्री खेचून आणली. दुसऱ्या डावात तिला पांढऱ्या मोहरांनी खेळण्याचा लाभ मिळणार आहे.
 उपउपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या या दोन खेळाडूंसह चार खेळाडूंनी स्थान मिळविले आहे. रशियाच्या व्हॅलेन्टिना गुनिना व नतालिया पोगोनिना यांनाही पहिल्या डावात अनुक्रमे पिआ क्रॅमलिंग (स्वीडन) व मेरी सिबाग (फ्रान्स) यांच्याकडून पराभवास सामोरे जावे लागले.
युक्रेनच्या मारिया मुझीचुक हिने माजी विश्वविजेती अन्तोनिता स्टीफानोवा (बल्गेरिया) हिच्याविरुद्ध पहिल्या डावात विजय मिळविला. चीनच्या झाओ झुई हिने जॉर्जियाच्या बेला खोतेनाश्वेली हिला पहिल्या डावात पराभूत केले.