सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररचे साम्राज्य संपुष्टात आणून टेनिस कोर्टवर अधिराज्य गाजवणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालचे साम्राज्य मावळतीकडे झुकू लागले आहे. २०१५ हे वर्ष त्याच्यासाठी आतापर्यंत निराशाजनकच ठरले आहे. ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच खुली टेनिस स्पध्रेपाठोपाठ विम्बल्डनमध्येही नदालच्या वाटय़ाला पराभवच आले. विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत १०२व्या स्थानावर असलेल्या जर्मनीच्या डस्टीन ब्राऊनने ७-५, ३-६, ६-४, ६-४ असा दणदणीत विजय मिळवून नदालसाठी शुक्रवारची रात्र काळरात्र ठरवली.
आर्थिक चणचणीमुळे मालवाहतूक गाडीतून प्रवास करत स्पध्रेत दाखल झालेल्या ब्राऊनने शुक्रवारी इतिहासाच्या पानावर स्थान पटकावले. १३ एसेस आणि ५८ विनर लगावत त्याने नदालला हतबल केले. जबरदस्त फॉरहँड, बॅकहँड आणि आक्रमक सव्‍‌र्हिसचा नजराणा पेश करताना ब्राऊनने बाजी मारली. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश करणाऱ्या खेळाडूकडून पराभव पत्करण्याची नदालची ही पहिलीच वेळ आहे. दोन तास ३४ मिनिटांत ब्राऊनने नदालला पराभव पत्करण्यास भाग पाडले. दुखापतीमुळे त्याला २०१४ साली अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेचे जेतेपद कायम राखण्यास अपयश आले आणि त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी त्याने निम्म्याहून अधिक वर्ष कोर्टबाहेरच काढले. गत महिन्यात त्याला फ्रेंच खुल्या स्पध्रेत पराभवाचा सामना करावा लागला. संपूर्ण कारकीर्दीतील फ्रेंच खुल्या स्पध्रेतील हा त्याचा दुसराच पराभव होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी हरलो. अर्थातच खूप दु:ख झाले आहे. पण, हा खेळ आहे. चांगले-वाईट क्षण अनुभवायला मिळतातच. हा पराभव स्वीकारायला हवा. कारकीर्दीत अनेकदा मी असे केले आहे. पुढे चालायला हवे. या पराभवामुळे सर्व काही संपलेले नाही. आयुष्य आणि कारकीर्द सुरूच राहील.
– राफेल नदाल

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After wimbledon exit rafael nadal sad but vows to carry on
First published on: 04-07-2015 at 02:31 IST