Rohit Sharma said the real match winner is Mohammed Siraj: टीम इंडियाने आशिया कप २०२३ चे विजेतेपद एकतर्फी पद्धतीने जिंकले. टीम इंडियाने फायनलमध्ये श्रीलंकेच्या टीमचा १० विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला अवघ्या ५० धावांत गुंडाळून ३७ चेंडूत लक्ष्य गाठून आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो होता मोहम्मद सिराज. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. टूर्नामेंट जिंकल्यानंतर टीमचा कर्णधार रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आणि खेळाडूंचं कौतुकही केलं.

कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंचे केले कौतुक –

सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ‘आम्ही खूप चांगली कामगिरी केली. अंतिम सामन्यात बाहेर येणे आणि तसे खेळणे हे मानसिक चारित्र्य दर्शवते. चेंडूने चांगली सुरुवात केली आणि बॅटने शानदार फिनिशिंग केली. मी स्लिपमध्ये उभा होतो आणि आम्हाला अभिमान आहे की, आमचे वेगवान गोलंदाज खूप मेहनत घेत आहेत. हे त्याच्या मनात अगदी स्पष्ट आहे. हे पाहून आनंद झाला. अशी कामगिरी आम्हाला दीर्घकाळ लक्षात राहील.’

रोहित शर्मा पुढे म्हणाला, ‘आम्ही अशी कामगिरी करू असा कधीच विचार केला नव्हता. हे खेळाडूंच्या कौशल्यावर अवलंबून असते. सिराजला खूप श्रेय दिले पाहिजे. सीमर्ससाठी चेंडू हवेत आणि खेळपट्टीबाहेर घेणे दुर्मिळ आहे. या स्पर्धेत आम्ही संघ म्हणून जे काही करता येईल ते केले. आता आमचे लक्ष भारतात होणाऱ्या मालिकेवर आणि त्यानंतर विश्वचषकावर आहे. त्या दबावाच्या परिस्थितीत हार्दिक आणि इशान यांनी पाकिस्तानविरुद्ध ज्या प्रकारे फलंदाजी केली आणि त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी शतके झळकावली. गिल ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे. यावरुन स्पष्ट होते की खेळाडू वेगवेगळ्या टप्प्यांवर उभे राहिले आहेत, जे आमच्यासाठी चांगले आहे.’

हेही वाचा – Asia Cup Final 2023: विजयानंतर टीम इंडियाने आशिया ट्रॉफीसह केला एकच जल्लोष, पाहा VIDEO

टीम इंडियाने आठव्यांदा आशिया कपवर कोरले नाव –

अंतिम सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही बाबतीत एकतर्फी कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु संपूर्ण संघ १५.२ षटकात केवळ ५० धावांवरच मर्यादित राहिला. टीम इंडियाने हे लक्ष्य ६.१ षटकांत कोणतेही विकेट न गमावता पूर्ण केले. यासह भारताने आठव्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. भारतीय संघाने आपल्या एकदिवसीय क्रिकेट इतिहासात चेंडू शिल्लक ठेवत सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. टीम इंडियाने हा सामना २६३ चेंडू राखून जिंकला.