नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील (एआयएफएफ) कारवाईचा फेरविचार करून बंदी उठवावी, अशी विनंती मंगळवारी ‘फिफा’कडे करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय समिती हटवल्यानंतर ‘एआयएफएफ’कडून त्वरित ही मागणी करण्यात आली आहे.

‘एआयएफएफ’चे हंगामी सचिव सुनांदो दास यांनी ‘फिफा’चे सचिव फातमा सामौरा यांना बंदीच्या कारवाईवरील फेरविचार करावा, अशी विनंती केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ‘फिफा’च्या अटी मान्य करताना  प्रशासकीय समिती हटवली आहे. ‘एआयएफएफ’च्या समितीकडेच पूर्ण सूत्रे सोपविण्यात आली आहेत. याचा विचार करून ‘एआयएफएफ’वरील निलंबनाच्या कारवाईचा फेरविचार करावा. निलंबनाची कारवाई जितक्या लवकर मागे घेतली जाईल, तेवढे भारतातील फुटबॉलसाठी फायद्याचे ठरणार आहे, असेही दास यांनी ‘फिफा’ला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

एआयएफएफची निवडणूक २ सप्टेंबरला

नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची (एआयएफएफ) निवडणूक आता २ सप्टेंबर रोजी होणार असून, यासाठी २५ ऑगस्टपासून नव्याने अर्ज भरण्यास सुरुवात होईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. ‘फिफा’च्या मागणीनुसार सर्वोच्च न्यायालयाने सोमवारीच ‘एआयएफएफ’वरील प्रशासकीय समिती हटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार निवडणूक एका आठवडय़ाने पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर २४ तासांत निवडणूक निर्णय अधिकारी उमेश सिन्हा यांनी नव्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. नव्या कार्यक्रमानुसार गुरुवार ते शनिवारदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर रविवारी या अर्जाची छाननी होईल.

भुतियाचा अर्ज राज्य संघटनेकडून आवश्यक

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खेळाडूंना थेट निवडणूक लढवता येणार नाही आणि त्यांना मतदानाचाही अधिकार नसेल. त्यामुळे आता भारताचा माजी कर्णधार बायच्युंग भुतियाला अध्यक्षपदासाठी निवडणूक लढायची असेल, तर त्याला राज्य संघटनेकडून उमेदवारीचा अर्ज भरावा लागेल.