मुंबई : दुखापतीतून सावरल्यानंतर प्रो कबड्डीच्या आगामी हंगामात यशस्वी पुनरागमन करण्याचा अस्लम इनामदारचा निर्धार असून पुणेरी पलटण संघाला पुन्हा जेतेपद मिळवून देण्याचे त्याचे लक्ष्य आहे.

‘‘आयुष्यात प्रत्येक परिस्थितीशी आपल्याला जुळवून घ्यावे लागते. माझ्या खेळण्याच्या शैलीमुळे ही दुखापत होणार याची कल्पना होती. माझ्यासाठी हे सामान्य होते. याहून कठीण स्थितीचा सामना मी केला आहे. या स्थितीतून मी बाहेर येऊ शकतो याबाबत मला विश्वास होता. मला या दुखापतीतून सावरण्यासाठी फार वेळ लागला नाही. तंदुरुस्त आणि पुनर्वसन केल्यानंतर मी मॅटवर परतलो,’’ असे पुणेरी संघाचा कर्णधार अस्लमने सांगितले.

‘‘मला अनेक स्पर्धा खेळण्याची संधी होती, मात्र मी सहभाग नोंदवला नाही. प्रो कबड्डी लीगमधील सहभाग महत्त्वाचा होता. फेडरेशन चषक, राष्ट्रीय कबड्डी यांसारख्या स्पर्धेत मी दुखापतीमुळे सहभाग नोंदवला नाही. मी या हंगामासाठी स्वत:ला तयार ठेवले आहे. आता संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे,’’ असे अस्लम म्हणाला.

संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी अजय ठाकूर यांच्याकडे आहे. त्याबद्दल अस्लम म्हणाला, ‘‘अजय ठाकूर यांच्या येण्याने खूप फरक पडेल. ते माजी खेळाडू आहे. त्यांचा प्रो कबड्डीतील खेळ पाहून आमच्यासारखे खेळाडू पुढे आले. खेळाडूंच्या दुखापती, त्यांचा स्वभाव आणि युवा खेळाडू कसे आहेत, याची अजय ठाकूर यांना कल्पना आहे. काही प्रशिक्षक खेळाडूंना समजून घेत नाही. मात्र, ठाकूर हे खेळाडूंना चांगल्या पद्धतीने समजून घेतात.’’

‘‘संघातील बचावावर सध्या आम्ही मेहनत घेत आहोत. चढाई ही नेहमीच आमची जमेची बाजू राहिली आहे. यावेळी बचावातही काहीच कमतरता जाणवणार नाही. यंदा केवळ जेतेपद हेच माझे लक्ष्य आहे,’’ असे संघ संयोजनाबाबत अस्लमने सांगितले.