‘हिमाचल कुमार’ या टोपणनावाने ओळखले जाणारे छोटू राम हे हिमाचल प्रदेशमधील नावाजलेले मल्ल. भारताकडून कुस्ती खेळण्याचे स्वप्न त्यांनी जोपासले होते, परंतु ते पूर्ण होऊ शकले नाही; पण त्यांचा मुलगा अजय ठाकूरने १९व्या वर्षी कबड्डीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून वडिलांच्या स्वप्नाची पूर्तता केली. मग २३व्या वर्षी अजयने चीनमध्ये झालेल्या आशियाई इन्डोअर स्पध्रेतील सुवर्णपदक जिंकून आणले. देशासाठी अभिमानास्पद असे पदक मुलाने जिंकल्याचे पाहून छोटू राम यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू उभे राहिले. अजय खेळत असलेल्या अनेक सामन्यांना ते आजही हजेरी लावतात. मुलाची तंदुरुस्ती, आहार आणि तंत्र याकडे आवर्जून लक्ष देतात. शनिवारपासून सुरू होणाऱ्या ‘प्रो-कबड्डी लीग’मध्ये अजय बंगळुरू बुल्स संघाकडून खेळणार आहे. ‘प्रो -कबड्डी’च्या लिलावात अजयला दुसऱ्या क्रमांकाचे १२ लाख २० हजार रुपये इतके मानधन मिळाले.
‘‘प्रो-कबड्डीच्या लिलावात किती पैसे मिळतील, याची प्रचंड उत्सुकता होती, पण कबड्डीत इतके चांगले दिवस येतील, असे वाटले नव्हते. मी माझ्या मित्रमंडळींसोबत लिलावाचा ऑनलाइन आढावा घेत होतो, पण जे मानधन मिळाले ते खूप आनंददायी आहे. प्रो कबड्डी लीगचे ‘स्टार स्पोर्ट्स’ वाहिनीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. टीव्हीच्या माध्यमातून कबड्डी हा खेळ आणि खेळाडू घराघरांमध्ये पोहोचतील. कबड्डी हा खेळ खूप मोठी वाटचाल करणार आहे,’’ अशी आशा २८ वर्षीय अजयने व्यक्त केली.
अजयचे काका जलाल ठाकूर हेसुद्धा राष्ट्रीय प्रशिक्षक. त्याच्यामधील सुप्त गुणवत्ता त्यांनी अचूकपणे हेरली. खेळावर निस्सीम प्रेम करणाऱ्या या ठाकूर कुटुंबात अजयवर खेळाचे संस्कार बालपणीपासूनच घडू लागले. मग तरुणपणी भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) कबड्डीचे शास्त्रशुद्ध धडे त्याने गिरवले. काही वर्षांपूर्वी तो सेनादलाचे प्रतिनिधित्व करायचा. आता एअर इंडियाकडून तो व्यावसायिक कबड्डी खेळत आहे. याबाबत तो सांगतो, ‘‘राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कबड्डीपटू एअर इंडियाकडून खेळतात. त्यांचे चांगले मार्गदर्शन मला लाभते. विशेषत: पंकज शिरसाटचा माझ्या खेळावर प्रभाव आहे. मी पंकजला माझा आदर्श मानतो.’’
बंगळुरू बुल्सच्या तयारीविषयी अजय म्हणाला, ‘‘आमचे सध्या बंगळुरूत सराव शिबीर चालू आहे. याचप्रमाणे सांघिक तयारी अतिशय चांगली झाली आहे. आता प्रत्यक्ष मैदानावर कर्तृत्व दाखवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’’
कबड्डीमधील सद्य:स्थिती मांडता तो म्हणाला की, ‘‘गुणी कबड्डीपटूंना चांगली नोकरी मिळणे मुळीच कठीण नाही. आज अनेक कबड्डीपटू प्रथम श्रेणीतील सरकारी नोकरी करीत आहेत. काही पोलीस दलात उपअधीक्षक आहेत, काही सरकारी, तर काही खासगी कंपन्यांमध्ये मोठय़ा हुद्दय़ांवर कार्यरत आहेत. कबड्डी या खेळाच्या बळावर या नोकऱ्या त्यांना मिळालेल्या आहेत.’’
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2014 रोजी प्रकाशित
अजय ठाकूरची कारकीर्द वडिलांच्या स्वप्नातून साकारली
‘हिमाचल कुमार’ या टोपणनावाने ओळखले जाणारे छोटू राम हे हिमाचल प्रदेशमधील नावाजलेले मल्ल. भारताकडून कुस्ती खेळण्याचे स्वप्न त्यांनी जोपासले होते

First published on: 25-07-2014 at 06:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay thakur career