ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

मुंबई : भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे वानखेडेच्या घरच्या प्रेक्षकांसमोर कसोटी सामना खेळण्याचे स्वप्न अद्यापही अपूर्णच आहे. स्नायूंच्या दुखापतीमुळे ३४ वर्षीय रहाणेला शुक्रवारपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीला मुकावे लागले.

कानपूर येथील कसोटीत भारताचे नेतृत्व करणारा रहाणे ७९ कसोटी खेळला आहे. परंतु जेथे त्याने क्रिकेटचे बारकावे शिकले, त्या मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये अद्याप एकही कसोटी खेळण्याचे भाग्य त्याला लाभलेले नाही. मात्र गुरुवारी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे सराव करताना आढळणारा रहाणे खरेच जायबंदी झाला की कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन आणि मुंबईकर श्रेयस अय्यरला संधी देण्याच्या हेतूने रहाणेला दुखापतीचे कारण देत संघाबाहेर करण्यात आले, असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या दशकभरात वानखेडेवर चार कसोटी सामने झाले. २०११मध्ये वेस्ट इंडिज, २०१२ला इंग्लंड, २०१३ला वेस्ट इंडिज आणि २०१६ला पुन्हा इंग्लंडविरुद्ध येथे कसोटी खेळवण्यात आली. ३४ वर्षीय रहाणेने २०१३मध्ये कसोटी कारकीर्दीला प्रारंभ केला. त्यानंतर तीन वर्षांनी २०१६मध्ये त्याला सर्वप्रथम घरच्या मैदानावर खेळण्याची संधी होती. परंतु इंग्लंडविरुद्ध डिसेंबरमध्येच वानखेडेवर झालेल्या त्या कसोटीच्या दोन दिवसांपूर्वी रहाणेच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे करुण नायरचा त्याच्या जागी संघात समावेश करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर आता पाच वर्षांनी रहाणेला वानखेडेवर खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु कानपूरमधील कसोटीच्या दुसऱ्या डावातच क्षेत्ररक्षण करताना रहाणेच्या मांडीचे स्नायू दुखावले गेल्याचे समजते. शुक्रवारी सकाळी सराव करताना त्याला तंदुरुस्त न वाटल्यामुळे संघ व्यवस्थापनाने रहाणेला विश्रांती दिली.