नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याच्या आकांक्षा हगवणे हिने कांस्यपदक मिळविले. तसेच तिने महिला कँडिडेट मास्टर किताबही मिळविला.
या स्पर्धेत भारत, इराण, कझाकिस्तान, तुर्कमिनिस्तान, व्हिएतनाम यांच्यासह चौदा देशांमधील अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी झाले होते. आकांक्षा हिने १४ वर्षांखालील गटात साडेसहा गुणांची कमाई केली. या गटात आर. वैशाली व रिया सावंत या भारतीय खेळाडूंनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळविले. आकांक्षा ही आंतरराष्ट्रीय मास्टर जयंत गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. या स्पर्धेसाठी अतुल डहाळे व अनिरुद्ध देशपांडे यांनीही तिला सरावासाठी मदत केली. आकांक्षा हिने आजपर्यंत अनेक राज्य व अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. आकांक्षा येथील डीईएस प्रशालेत नवव्या इयत्तेत शिकत आहे. तिला या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता नायडू यांचेही सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटात हर्ष भरतकोडी व आर्यन घोलामी यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले. १६ वर्षांखालील गटात आर.विशाख व अरविंद चिदंबरम यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकाविले. मुलींच्या १६ वर्षांखालील गटात एम.महालक्ष्मी हिने रौप्यपदक घेतले. मुलांच्या १८ वर्षांखालील गटांत भारताच्या चक्रवर्ती रेड्डी याने साडेसहा गुणांसह विजेतेपद मिळविले.