Was Akash Deep’s delivery to Joe Root a no-ball?: भारतीय संघाने बर्मिंगहम कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवत इंग्लंडविरूद्ध मालिकेत बरोबरी साधली आहे. भारताने पहिली कसोटी गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटीत दणक्यात पुनरागमन करत इंग्लंडचा तब्बल ३३६ धावांनी मोठा पराभव केला आहे. आकाशदीपने दुसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्स घेतले. आकाशदीपने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडच्या वरच्या फलंदाजीला फळीला फार काळ मैदानावर टिकू दिले नाही. यामधील सर्वात मोठी विकेट होती जो रूटची. पण जो रूट ज्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला, तो बॅकफूट नो बॉल असल्याचा वाद सुरू आहे.
जसप्रीत बुमराहच्या जागी एजबेस्टन कसोटी सामन्यात समावेश करण्यात आलेल्या वेगवान गोलंदाज आकाश दीपने संधीचं सोनं करत उत्कृष्ट कामगिरी केली. या सामन्यात आकाश दीपच्या एका चेंडूची चर्चा आहे. ज्यामध्ये त्याने जो रूटला बाद केलं आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, आकाशदीपचा चेंडू बॅकफूट नो-बॉल घोषित करायला हवा होता, ज्यामध्ये मेरीलेबोन क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसीचे विधान देखील आले आहे.
एजबेस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघ भारताने दिलेल्या ६०८ धावांचा पाठलाग करत होता. ३० धावांच्या आत संघाचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले. त्यानंतर आलेल्या जो रूटने आपल्या अनुभवाच्या जोरावर एका टोकाकडून इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ११ व्या षटकात आकाशदीपच्या कमाचीच्या चेंडूवर जो रूट क्लीन बोल्ड झाला. हा चेंडू टाकतानाचा आकाशदीपचा फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनेक दिग्गज म्हणत आहेत की, हा चेंडू बॅकफूट नो बॉल दिला पाहिजे, कारण आकाशचा मागचा पाय क्रीजच्या बाहेर आहे.
आता या चर्चांवर एमसीसीने (मेरीलेबोन क्रिकेट क्लब) वक्तव्य केलं आहे. एमसीसीने म्हटले आहे की, एजबेस्टनच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान आकाश दीपने जो रूटला टाकलेल्या चेंडूवर चाहते आणि समालोचकांकडून तो नो बॉल म्हणत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. चेंडू टाकत असताना आकाशदीपचा मागचा पाय क्रीजच्या बाहेर असल्याचे दिसले आणि पंचांनी हा चेंडू योग्य चेंडू असल्याचे म्हटले. एमसीसी सांगू इच्छिते की, नियमाप्रमाणे पंचांचा हा निर्णय अगदी योग्य आहे.
त्यांनी गोलंदाजाच्या पायाबाबतची महत्त्वाची माहिती पुढे देताना सांगितलं, “सुरूवातीला मैदानावर पाय जिथे लँड झाला आणि टच झाला, तेच महत्त्वाचं असं एमसीसी मानते. पायाचा भाग जमिनीला स्पर्श करताच, तो पाय रेषेच्या आतील भागात आहे. म्हणजेच आकाशदीपचा पाय लँड झाला तेव्हा तो रेषेच्या आतमध्ये होता, त्यामुळे नियमाप्रमाणे तो कायदेशीर चेंडू होता आणि पंचांचा निर्णय योग्य होता.
आकाश दीपने इंग्लंडविरुद्धच्या एजबेस्टन कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात त्याने ६ विकेट्स घेतल्या ज्यामध्ये इंग्लंडच्या टॉप-५ खेळाडूंपैकी ४ खेळाडूंना बाद करण्यात आलं. आकाशदीपने यासह त्याच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच एका डावात ५ विकेट घेतले. तर संपूर्ण सामन्यात त्याने १० विकेट्स आपल्या नावे केले.