विधानसभा निवडणूक प्रचाराचा धुरळा आणि विजयी जल्लोषाच्या रंगपंचमीत न्हाऊन निघालेल्या उत्तर प्रदेशात रविवारी पार पडलेल्या ट्रक शर्यतीने क्रीडाप्रेमींना आपलेसे केले. राजधानीनजीक असलेल्या, परंतु उत्तर प्रदेशच्या नकाशात स्थान असणाऱ्या ग्रेटर नोएडा येथे यजमान शर्यतपटूंचा दबदबा दिसला. बुद्ध आंतरराष्ट्रीय सíकटवर झालेल्या टाटा टी-वन ट्रक शर्यतीत सुपर क्लास प्रकारात उत्तर प्रदेशच्या शर्यतपटूंनी अव्वल तीन स्थान पटकावले. या शर्यतीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या चॅम्पियन्स क्लास प्रकारात नागार्जुनने वर्चस्व गाजवले.

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या दमदार प्रवेशाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. चालत्या ट्रकच्या छतावर बसून अक्षयने केलेल्या प्रवेशाने वाहवाह मिळवली. तत्पूर्वी, झालेल्या सुपर क्लास प्रकारात उत्तर प्रदेशच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. २९ वर्षीय पिलांबरने १८ मिनिटे ३७.४५७ सेकंदांत १० टप्पे पूर्ण करत जेतेपदाचा चषक उंचावला. ४० वर्षीय शिवनिहाल सिंह (१९:१०.६८३ से.) आणि ३३ वर्षीय गुरुजंत सिंह (१९:१४.२२० से.) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. राजस्थानच्या मोहाबत सिंगने (१:५०.६७७) जलद टप्पा गाठण्याची किमया साधली.

मागील मोसमात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दहा भारतीय शर्यतपटूंसाठी आयोजित केलेल्या चॅम्पियन्स क्लास प्रकारात नागार्जुनने बाजी मारली. गत मोसमातील सुपर प्रो प्रकारातही नागार्जुन विजयी झाला होता. त्यामुळे सर्वाच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. तोच फॉर्म कायम राखत आंध्रप्रदेशच्या नागार्जुनने चषक उंचावला. उत्तर प्रदेशच्या मलकीत सिंगला तीन सेकंदांच्या फरकाने दुसऱ्या, तर राजस्थानच्या भाग चंदला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

चुरशीची शर्यत

आंतरराष्ट्रीय शर्यतपटूंच्या गटात चुरस पाहायला मिळाली. डिलर डेअरडेव्हिल्सचा चेक प्रजासत्ताकच्या डेव्हिड व्हस्रेकीने अवघ्या ०.२५७ सेकंदांच्या फरकाने अव्वल स्थान पटकावले. टाटा टेक्नॉलॉजी संघाच्या नॉर्बर्ट किस (हंगेरी) आणि डिलर्स वॉरियर्सच्या गेर्ड कोब्रेर (जर्मनी) यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गतविजेत्या क्युमिन्स संघाचा डेव्हिड जेंकिन्स सहव्या स्थानी फेकला गेला.