Akash Deep Buy New Dream Car: भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरील शानदार कामगिरीनंतर मायदेशी परतला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने कमालीची कामगिरी केली. या मालिकेत गोलंदाज आकाशदीपनेही दुसरा कसोटी सामना जिंकण्यात मोठी भूमिका बजावली होती. आता मायदेशी परतताच त्याने आपलं मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे.

इंग्लंडहून परतल्यानंतर आकाश दीपने त्याची स्वप्नातील कार खरेदी केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर कारचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तो त्याच्या कुटुंबाबरोबर दिसत आहे. तसेच, कारची पूजा केली जात असल्याचंही दिसून येते. आकाशदीपने त्याच्या संपूर्ण कुटुंबासह आणि त्याच्या लाडक्या बहिणींसह देखील फोटो काढले आहेत.

आकाशदीपने शेअर केलेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “स्वप्न साकार झालं. कारच्या चाव्या मिळाल्या. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांबरोबर” आकाशदीपने टोयोटाची काळ्या रंगाची फॉर्च्युनर कार घेतली आहे.

आकाशदीपची इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी

आकाश दीपने इंग्लंड दौऱ्यावर ३ कसोटी सामने खेळले आहेत. मालिकेतील पहिल्या लीड्स कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. यानंतर जसप्रीत बुमराहला बर्मिंगहममध्ये विश्रांती देण्यात आली, त्यामुळे आकाश दीपला स्थान मिळाले. या सामन्यात आकाशदीपने चमकदार कामगिरी करत एकूण १० विकेट्स घेतल्या. लॉर्ड्स कसोटीतही त्याला बुमराह आणि सिराजसह खेळण्याची संधी मिळाली, पण या सामन्यात त्याला १ विकेट घेता आली.

मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत आकाशला दुखापतीमुळे खेळण्याची संधी मिळाली नाही. पण अखेरच्या ओव्हल मैदानावर झालेल्या पाचव्या कसोटीत त्याने जोरदार पुनरागमन केलं. आकाशने केवळ चेंडूनेच नव्हे तर फलंदाजीतही योगदान दिलं. २ विकेट्स घेण्याव्यतिरिक्त, त्याने ६६ धावांची विस्फोटक आणि महत्त्वपूर्ण खेळी केली. नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेल्या आकाशदीपने तिसऱ्या विकेटसाठी यशस्वी जैस्वालसह शतकी भागीदारी रचत भारताला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला.

आकाश दीपने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत १० कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १८ डावांमध्ये ३५.७८ च्या सरासरीने आणि ३.९१ च्या इकॉनॉमीने २८ विकेट्स घेतल्या आहेत. १०/१८७ ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. त्याने एकदा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे.