स्लोव्हाकियाच्या अल्जाझ बेडेने याने धडाकेबाज कामगिरीचे प्रदर्शन करत तिसऱ्या मानांकित रॉबेटरे बॅटिस्टाचा पराभव करून पहिल्यांदाच एटीपी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बेडेनेने जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानावरील बॅटिस्टाला ३-६, ६-३, ७-६ (८) असा पराभवाचा धक्का दिला. पात्रता फेरी ते अंतिम लढत असा प्रवास करणारा बेडेने हा चेन्नई स्पर्धेच्या २० वर्षांच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे.
अंतिम फेरीत मजल मारताना बेडेनेने आतापर्यंत दुसऱ्या मानांकित फेलिसियानो लोपेझ व पाचव्या मानांकित गुइलेर्मो गार्सिया-लोपेझ यांना पराभवाची धूळ चारली आहे. पहिला सेट गमावल्यावरही शांत व संयमी खेळ करत बेडेनेने बॅटिस्टाला दडपणाखाली ठेवले. तिसऱ्या सेटमध्ये बॅटिस्टा जिंकण्याच्या स्थितीत असताना बेडेनेने सामना टायब्रेकरमध्ये नेला. त्यानंतर सुरेख खेळ करत त्याने विजयश्री मिळवली. ‘‘मी घेतलेल्या कठोर मेहनतीचे फळ मिळाले. दोन वेळा उपांत्य फेरीत हरल्यामुळे हा सामना मला कोणत्याही स्थितीत जिंकायचा होता. बॅटिस्टाला हरवल्यामुळे मला आनंद झाला आहे,’’ असे बेडेने म्हणाला.