‘‘निवास आणि निवासी या शब्दांचा खेळ करून मला अडकवण्यात आले. कायमस्वरूपी वास्तव्याची नवी व्याख्या त्यामुळे मला पाहायला मिळाली. कोण हरकत घेऊ शकतो, या नियमांकडेही दुर्लक्ष करण्यात आले. माझ्या बाजूचा न्याय्य पद्धतीने विचार करण्यात आला नाही, हा माझ्यावर अन्याय आहे. माझा अध्यक्षपदासाठी अर्ज फेटाळण्यात आला, या विरोधात मी शहर दिवाणी न्यायालयात दाद मागणार आहे,’’ असे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘‘पवार यांची अध्यक्षपदावर बिनविरोधपणे निवड ही घोषणा करू नये, तशी झाल्यास संबंधितांवर कारवाई करावी असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचप्रमाणे अध्यक्षपद वगळता सर्व पदांच्या निवडणुका शुक्रवारी घ्याव्यात. अध्यक्षपदाची निवडणूक स्वतंत्रपणे निष्पक्षपाती वातावरणात घेण्यात यावी अशी मागणी मी करीत आहे,’’ असे मुंडे यांनी सांगितले.
‘‘मागील निवडणुकांच्या वेळी विलासराव देशमुख यांच्याबाबतही आक्षेप घेण्यात आला होता. परंतु पासपोर्ट हा एकमेव पुरावा योग्य मानून त्यांना परवानगी देण्यात आली होती. पवार दहा वष्रे एमसीएच्या अध्यक्षपदावर होते, तेव्हा त्यांचेही नाव मुंबईच्या मतदारयादीत नव्हते,’’ असे दावे मुंडे यांच्याकडून करण्यात आले. ‘‘पवार एमसीए आपली खासगी मालमत्ता असल्याप्रमाणेच वागत आहेत. बीसीसीआय, आयसीसी यांच्यासारखी महत्त्वाची पदे भूषवल्यानंतर आता ते एमसीएसारख्या छोटय़ा पदांमध्ये का पुन्हा उत्सुकता दर्शवत आहेत. पवार बिनविरोधपणे निवडून यावेत यासाठी मला निवडणुकीतून बाद करण्याचे ठरवले आहे,’’ असे मुंडे यांनी सांगितले.