भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रायुडूने अचानक निवृत्ती घेतल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आच्शर्य व्यक्त केले जात आहे. इंग्लंड येथे सुरू असलेल्या विश्वचषकात दोन वेळा डावलल्यामुळे निवृत्ती घेतल्याचे बोलले जात आहे.

एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी रायुडूने नोव्हेंबर २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. रायुडूने २००४ मध्ये भारतीय अंडर १९ संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. रायुडूच्या नेतृत्वाखाली शिखर धवन, दिनेश कार्तिक, आरपी सिंह आणि सुरैश रैना सारख्ये दिग्गज खेळाडू खेळले आहेत.

रायुडूने भारतीय संघाकडून ५० एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये ४७ च्या सरासरीने १६९४ धावा केल्या आहेत. रायुडूची सर्वोत्कृष्ट खेळी नाबाद १२४ धावांची आहे. रायुडूने तीन शतके आणि दहा अर्धशतके झळकावली आहेत. रायुडूला टी-२०मध्ये आपला प्रभाव दाखवता आला नाही. सहा टी-२० मध्ये रायुडूला फक्त ४२ धावा करता आल्या आहेत.

वाद आणि रायुडू –
छोट्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रायुडूने अनेक वेळा वादाचा सामाना केला आहे. २००७ मध्ये इंडियन क्रिकेट लीग (ICL)शी करार केल्यामुळे बीसीसीआयने रायुडूवर बंदी घातली होती. दोन वर्ष रायुडू क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर २००९ मध्ये माफी मागितल्यानंतर बीसीसीआयने खेळण्याची परवाणगी दिली होती.

२००५ मध्ये रणजी सामन्यादरम्यान रायुडूने प्रतिस्पर्धी खेळाडूला मैदानावर मारण्याचा प्रयत्न केला होता. आंध्रा प्रदेशमध्ये सामना खेळताना अर्जुन यादव सोबत रायुडूचा वाद झाला होता. त्याला मारण्यासाठी रायुडूने स्टंप उपसला होता.