काही दिवस, काही आठवणी यांचा योगायोगाशी अनन्यसाधारण संबंध असतो. गेल्या वर्षी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला असताना यजमानांनी पहिले तीन सामने जिंकत ३-० अशी निर्विवादपणे आघाडी घेतली होती. त्यावेळी संथ षटकांच्या गतीमुळे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला चौथ्या सामन्यात कर्णधारपद भूषवता आले नव्हते, तर उपकर्णधार वीरेंद्र सेहवागने नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. आता ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आहे आणि यजमानांनी ३-० अशी निर्विवादपणे आघाडी घेतली असून पाहुण्यांचा कर्णधार मायकल क्लार्क पाठीच्या दुखापतीमुळे खेळणार की नाही, ही संदिग्धता निर्माण झाली असून त्याच्या जागी कर्णधारपदाची धुरा शेन वॉटसनकडे येण्याची शक्यता आहे.
‘‘सामना सुरू व्हायला अजूनही २४ तास बाकी आहेत, दुखापतीवर उपचार कसे सुरू आहेत आणि त्यामधून मी किती सावरलो आहे हे पाहावे लागेल. मी खेळू शकेन की नाही, याचा निर्णय सामन्याच्या दिवशी सकाळी घेण्यात येईल,’’ असे क्लार्कने सांगितले.
‘‘वयाच्या १७ व्या वर्षांपासून मला हा त्रास जाणवत असून त्याच्याशी मी झगडत आहे. आगामी स्पर्धेसाठी मी दुखापतविरहित राहायला हवे, याची काळजी मी घेईन. मी पहिल्यांदा दुखापतीचे स्वरूप बघेन आणि त्यानंतर सामन्याच्या दिवशी सकाळी निर्णय घेईन. २००४ साली मी जेव्हा पदार्पण केले, तेव्हापासून मी एकदाही दुखापतीमुळे सामन्याला मुकलेलो नाही आणि चौथ्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन,’’ असे क्लार्क म्हणाला.
वॉटसनबद्दल क्लार्कला विचारले असता तो म्हणाला की, ‘वॉटसन हा संघात एक महत्त्वाचा भाग आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पण वॉटसनने जर चौथ्या कसोटी सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन केले तर त्याच्या खेळात मोठा बदल होईल. अखेरचा सामना जिंकून जर मायदेशी परतलो तर ते आमच्यासाठी समाधानकारक असेल. आमच्यासाठी चौथा सामना जिंकणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.