लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. पण बुद्धिबळाच्या पटावर त्यांच्या रेशीमगाठी जुळल्या. मग चौसष्ट घरांच्या बुद्धिबळाच्या पटावर त्यांनी आपल्या सुखी संसाराची स्वप्ने पाहिली. आता बुद्धिबळातील ही राजा-राणीची जोडी आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना ‘चेकमेट’ देऊन नव्या आयुष्यासाठी सज्ज झाले आहेत.
पुण्याची अमृता मोकल व मुंबईचा सागर शहा हे दोघेही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू. पाच वर्षांपूर्वी बुद्धिबळ खेळतानाच त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मग मैत्रीत आणि त्यानंतर आता ते आयुष्यभराचे जोडीदार झाले आहेत. या दोघांच्या विवाहाच्या निमंत्रणपत्रिकेवर राजा व वजीर यांची चित्रे होती. पुण्यातील एका कार्यालयात झालेल्या समारंभाला बुद्धिबळमय स्वरूप देण्यात आले होते. व्यासपीठावरील पडद्यावर थर्माकोलचे बुद्धिबळातील मोहरे चिकटविण्यात आले होते. लग्न लागल्यानंतर कार्यालयातच तीन मिनिटांची जलद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, विदित गुजराथी, समीर कठमाळे यांच्यासह नामवंत खेळाडू सहभागी झाले होते.
बुद्धिबळपटू वधू-वराच्या या विवाह सोहळ्याने सारेच वातावरण बुद्धिबळमय होते. अगदी पत्रिकेपासून ते विवाहस्थळावरील प्रत्येक गोष्टीत पटाची आणि विविध मोहऱ्यांची झलक सर्वाचेच लक्ष वेधत होती. त्यामुळेच विवाहाला हजेरी लावणाऱ्या बुद्धिबळ क्षेत्रातील मान्यवरांप्रमाणेच अन्य मंडळींसाठीही ही बुद्धिबळपर्वणी ठरली.
या समारंभाला ज्येष्ठ प्रशिक्षक मोहन फडके, प्रकाश कुंटे, जयंत गोखले, चंद्रशेखर गोखले, मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर, जोसेफ डीसुझा, तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिषेक केळकर, कृत्तिका नाडिग यांच्यासह अनेक खेळाडू उपस्थित होते.