नवी दिल्ली : भारताचा विश्वनाथन आनंद आणि रशियाचा गॅरी कास्पारोव या दिग्गज बुद्धिबळपटूंना पुन्हा एकमेकांविरुद्ध खेळताना पाहण्याची संधी चाहत्यांना पुढील महिन्यात मिळणार आहे. आनंद विरुद्ध कास्पारोव प्रदर्शनीय लढत अमेरिकेच्या सेंट लुइस येथे ऑक्टोबरमध्ये रंगणार आहे. त्यानंतर याच ठिकाणी सध्याच्या आघाडीच्या बुद्धिबळपटूंमध्ये प्रदर्शनीय स्पर्धा रंगणार असून यात विद्यमान जगज्जेता भारताचा दोम्माराजू गुकेश आणि माजी जगज्जेता मॅग्नस कार्लसन यांच्यात लढत होईल.
कास्पारोव आणि आनंद हे माजी जगज्जेते बुद्धिबळपटू एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात. या दोघांमधील अखेरची लढत २०२१ मध्ये क्रोएशिया जलद आणि अतिजलद स्पर्धेत झाली होती. त्यावेळी आनंद विजेता ठरला होता. या दोघांनी एकमेकांविरुद्ध एकूण ८२ लढती खेळल्या असून यात कास्पोरोव अधिक वेळा सरस ठरला आहे, तर ३० लढती बरोबरीत सुटल्या आहेत.
‘दोन माजी जगज्जेते, कास्पारोव आणि आनंद ‘क्लच चेस’ प्रदर्शनीय लढतीत (७ ते ११ ऑक्टोबर) आमनेसामने येतील,’ असे सेंट लुइस क्लबने आपल्या निवेदनात नमूद केले. त्यानंतर याच ठिकाणी २७ ते २९ ऑक्टोबर या कालवधीत ‘क्लच चेस : चॅम्पियन्स शोडाऊन’ प्रदर्शनीय स्पर्धा होणार आहे. यात जागतिक क्रमवारीतील अव्वल तीन खेळाडू कार्लसन, हिकारू नाकामुरा आणि फॅबियानो कारुआना यांच्यासह जगज्जेत्या गुकेशचा सहभाग असेल. यात गुकेश विरुद्ध कार्लसन लढत होणार आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत एकूण ४९ लढती झाल्या असून यात कार्लसनने ३१ वेळा, तर गुकेशने १२ वेळा विजय मिळवला आहे. सहा लढती बरोबरीत सुटल्या आहेत.