Anaya Bangar Cricket Practise: वुमेन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. सर्व ५ संघामनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे. आगामी हंगामापूर्वी सर्व ५ संघांमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या अनाया बांगरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आरसीबीची किटबॅग घेऊन मैदानात उतरली असून फलंदाजीचा सराव करताना दिसून येत आहे.
अनायाचा व्हिडीओ तुफान व्हायरल
अनाया क्रिकेटमुळे नेहमीच चर्चेत असते. लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर तिने भारतीय महिला संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. क्रिकेटवर तिचं आधीपासून प्रेम आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची किट बॅग घेऊन मैदानात जाताना दिसून येत आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला ती जॉगिंग करताना दिसून येत आहे. त्यानंतर वॉर्म-अप आणि आणि मग स्ट्रेचिंग करताना दिसून येत आहे. त्यानंतर पॅड आणि हेल्मेट घालून ती शॅडो प्रॅक्टिसमध्ये कव्हर ड्राईव्ह मारताना दिसून येत आहे.
या व्हिडीओला तिने हटके कॅप्शन देखील दिलं आहे. कॅप्शन देत तिने लिहिले की, “माझं आयुष्य बदललं असलं तरीदेखील माझं तेच आहे.” अनायाचे वडील हे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच तिच्यावर क्रिकेटचे संस्कार आहेत. आर्यनची अनाया होण्यापूर्वी आर्यन बांगर हा मुंबई संघासाठी खेळायचा. सरफराज खान आणि मुशीर खान हे खेळाडू सरफराजसोबत एकाच संघातून खेळायचे. पण त्यानंतर आर्यनने लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
आर्यनने हार्मोन रिप्लेसेमेंट थेरपी केली आहे. त्यामुळे आता तिला अनाया बांगर ही नवी ओळख मिळाली आहे. अनाया बांगरचे वडील संजय बांगर हे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आहेत. यासह त्यांनी आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला देखील प्रशिक्षण दिलं आहे. संजय बांगर यांना भारतीय संघाकडून १२ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्यांनी २९.३७ च्या सरासरीने ४७० धावा केल्या होत्या. सध्या ते प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत.
