विश्वचषक फुटबॉल स्पध्रेतील ‘ह’ गटात अखेरच्या स्थानावर समाधान मानून मायदेशी परतलेल्या दक्षिण कोरियाच्या संघाला एका ‘कडू-गोड’ अनुभवाला सामोरे जावे लागले. इन्चॉन विमानतळावर दाखल झालेल्या अपयशी दक्षिण कोरियाच्या चमूवर चाहत्यांनी चक्क गोड गोळ्यांचा (टॉफी) हल्ला केला.
विश्वचषक स्पध्रेतील खराब कामगिरीमुळे अनेक संघांना मायदेशी अशा प्रकारच्या वागणुकीला सामोरे जावे लागले आहे. १९६६ मध्ये इटलीच्या संघावर टॉमेटोंचा मारा करण्यात आला होता. याच प्रकारची अपमानास्पद वागणूक कोरियन चाहत्यांनी आपल्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंना दिली आहे.
ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत दक्षिण कोरियाच्या संघाने तीन सामन्यांपैकी दोन पराभव पत्करले, तर एक सामना बरोबरीत सोडवला. १९९८ नंतर प्रथमच कोरियाला विश्वचषक स्पध्रेत एकही सामना जिंकण्यात यश आले नाही. या पाश्र्वभूमीवर इन्चॉन विमानतळावर दाखल झालेल्या संघातील खेळाडू छायाचित्रणासाठी जेव्हा उभे राहिले, तेव्हा संतप्त चाहत्यांनी त्यांच्यावर टॉफींचा मारा केला. ‘जा टॉफी खा’, ‘चालते व्हा’ अशा प्रकारे कोरियाचे चाहते घोषणा देत होते.
‘‘विश्वचषक स्पध्रेदरम्यान नागरिकांनी दिलेल्या प्रेमाची आणि समर्थनाची मी परतफेड करू शकलो नाही याबद्दल मी दिलगीर आहे,’’ अशा शब्दांत दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक हाँग म्युंबग-बो यांनी ‘कोरिया हेराल्ड’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत माफी मागितली.
ते पुढे म्हणाले, ‘‘आमचा संघ अपेक्षित निकाल देऊ शकला नाही, याबाबत मी व्यक्तिश: जबाबदार आहे. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले म्हणजे आम्ही सर्वस्व गमावलेले नाही. कोरियाच्या खेळाडूंचे भवितव्य उज्ज्वल आहे.’’