भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या (आयओए) खजिनदारपदासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी मुदत संपल्यानंतर दोनजणांचे अर्ज स्वीकारले, असा आरोप खजिनदारपदाचे उमेदवार हरिओम कौशिक यांनी येथे केला आहे.
राष्ट्रीय तलवारबाजी महासंघाचे सचिव असलेले कौशिक यांनी सांगितले, की खजिनदारपदासाठी १६ नोव्हेंबरपूर्वी अर्ज सादर करायचे होते. मात्र एन. रामचंद्रन व हरीश शर्मा यांनी या पदासाठी केलेले अर्ज मुदतीनंतर स्वीकारले आहेत. नियमानुसार मुदतीनंतर आलेले अर्ज फेटाळण्याची आवश्यकता होती, मात्र निवडणूक अधिकारी निवृत्त न्यायाधीश व्ही. के. बाली यांनी या दोन्ही उमेदवारांची नावे उमेदवारांच्या यादीत टाकली आहेत.
आपण या संदर्भात बाली यांना सविस्तर पत्र लिहिले असून या दोन्ही उमेदवारांची नावे काढून टाकण्याची मागणी केली आहे.खजिनदारपदासाठी अखिल भारतीय टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना हेही शर्यतीत आहेत. आयओएची निवडणूक ५ डिसेंबर रोजी होणार आहे