आयपीएलला क्रिकेटसोबतच ग्लॅमर आणि मनोरंजनाचा तडका असल्याने स्पर्धेची लोकप्रियता प्रचंड आहे. क्रिकेट क्षेत्रात समालोचन आणि सूत्र संचालनात पुरूषांची मक्तेदारी मोडून काढत आयपीएलमधून आपल्याला ग्लॅमरस सूत्रसंचालिका देखील पाहायला मिळाल्या. त्यात आयपीएलच्या यंदाच्या पर्वात सूत्रसंचालक अर्चना विजया हिचे पुनरागमन झाले. मागील पर्वात अर्चना विजया आयपीएलपासून दूर होती. पण यंदा तिच्या पुनरागमनापेक्षा तिचे एक छायाचित्र चर्चेचा विषय ठरत आहे. अर्चना विजया हिचे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबतचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. छायाचित्रात विराटच्या ‘नजरे’वरून नेटिझन्सने विविध तर्कवितर्क लढवण्यास सुरूवात केली. अर्थात याचा खूप मोठा फटका अर्चना विजया हिला बसला. नेटिझन्सच्या कमेंट्समुळे ती दुखावली गेली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या छायाचित्रात अर्चनाचे लक्ष कॅमेरात असून, ती विराटचा मुलाखत घेताना दिसते. पण त्याच विराटचे लक्ष अर्चनाच्या जीन्सकडे असल्याचे तर्कट मांडून नेटिझन्सने हे छायाचित्र चांगलेच व्हायरल केले आहे. नेटिझन्सना त्रासलेल्या अर्चनाने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत आपला संताप देखील व्यक्त केला.
”लोक हेडलाईनसाठी काहीही तर्क लढवतात याचा खरंच मला खूप मोठा धक्का बसला. खरंच एखाद्याला बदनाम करण्यासाठी लोक इतके भुकलेले असू शकतात?”, असा सवाल उपस्थित करत अर्चनाने नेटिझन्सला फटकारले आहे.
”आम्ही रॅपिड फायर राऊंड खेळत होतो. तेव्हा विराट माझ्या नकळत प्रश्नांची उत्तर पाहण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या हातात रॅपिड फायरसाठीचे प्रश्नोत्तरांचे कार्ड होते त्याकडे विराट पाहात होता.”, असे स्पष्टीकरणही अर्चना दिले.
अर्चनाने यावेळी कोहलीचे कौतुक देखील केले. ”विराटने एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून खूप प्रगती केली. त्याचा क्रिकेटप्रतीच्या शिस्तीचे सर्वच चाहते आहेत. तो खूप स्पष्ट आणि मनमोकळा व्यक्ती आहे. मला पाहिल्यानंतर त्याने पटकन ओळखही दाखवली. आमच्यात छान गप्पा रंगल्या.”, असे अर्चनाने सांगितले.