भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालीकेतील दुसरी कसोटी ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान लॉर्ड्सच्या मैदानावर होणार आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारतावर सामन्याच्या चौथ्या दिवशी ३१ धावांनी विजय मिळवला. १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव १६२ धावांवर आटोपला. या विजयासह इंग्लंडने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विराट कोहली वगळता कोणत्याही फलंदाजाला या सामन्यात छाप पाडता आली नाही.

त्यामुळे दुसऱ्या सामन्याआधी विराटसेनेने नेट्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चेंडूंवर सराव केला. प्रत्येक फलंदाजाने सराव सत्रात आपल्या बलस्थानांवर सराव केला. मात्र या सराव सत्रात एक वेगळी गोष्ट पाहण्यात आली. ते म्हणजे या सत्रात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने विराट आणि कंपनीला गोलंदाजी केली. खुद्द बीसीसीएने या संदर्भातील व्हिडीओ ट्विट केला होता.

हा पहा व्हिडीओ –

 

अर्जुन तेंडुलकर हा भारतीय संघाचा सदस्य नसतानादेखील त्याला संघातील खेळाडूंना गोलंदाजी करण्याची संधी मिळाली, या गोष्टीवरून सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमंतून अनेकांनी टीका केली. काहींनी याचा संबंध थेट सचिन तेंडुलकर याच्याशी जोडत त्याच्यावरही टीका केली. पण अर्जुन तेंडुलकरला भारतीय संघातील फलंदाजांना गोलंदाजी करायला सांगण्यात मागे भारतीय संघ व्यवस्थापनाचा एक ‘प्लॅन’ असल्याचे बोलले जात आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सॅम कुरानला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने पहिल्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यानंतर भारताकडे एकही डावखुरा वेगवान गोलंदाज नसल्याने असे झाले असल्याच्या चर्चा रंगल्या. अशा परिस्थितीत अर्जुन तेंडुलकर याच्यासारख्या उमेदीच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाच्या गोलंदाजीवर भारतीय संघाला सराव करायला लावले जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, जर हा ‘बीसीसीआय’चा प्लॅन असेल, तर उर्वरित सामन्यांमध्ये तो कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.