डॉ. प्रकाश परांजपे संगणकाच्या मदतीने ‘डावाचा ‘ठेवा’ ’ (पार स्कोअर) सहज काढता येतो. वर दिलेल्या चित्रात पानांच्या खाली एका ओळीत हे संगणक-उत्तर छापलेलं आहे. पपूऐवजी पप आणि हुकमाच्या अक्षराऐवजी हुकमाचं चिन्ह वापरून छापलेलं हे उत्तर काय सांगतं? कोण किती दस्त जिंकू शकणार, हे निवडलेल्या पंथावर अवलंबून असतं. पपू ३ बदाम म्हणजे प-पू जोडी ३ बदामचा ठेका निभावू शकेल, म्हणजे ६+३=९ दस्त जिंकू शकेल. ब्रिजमध्ये बोली करताना पहिले ६ दस्त हे गृहीत धरलेले असतात, हे आपण पूर्वी बघितलेलं आहेच, असं या उत्तराचा पहिला भाग आपल्याला सांगतो. याचप्रमाणे इस्पिक हुकूम असेल तर उ-द जोडी ८ दस्त जिंकू शकेल; किलवर हुकमात प-पू जोडी ९ दस्त जिंकू शकेल; चौकट हुकमात प-पू जोडी ७ दस्त बनवू शकेल; आणि ठेका बिनहुकमी असेल तर उ-द जोडी ७ दस्त बनवू शकेल असं संगणकाचं उत्तर आहे. गमतीचा भाग म्हणून किंवा खेळाचा अभ्यास म्हणून तुम्हीही चारी खेळाडूंची पानं मांडून संगणकाचं हे उत्तर तपासू शकता. उदाहरणार्थ, इस्पिक हुकूम असेल तर उ-द जोडीला इस्पिकचे ६, चौकट एक्क्याचा १, आणि किलवर राणीचा एक असे ८ दस्त जिंकता येतील. संगणक उ-द २ इस्पिक या उत्तराद्वारे तेच दाखवतो आहे. अर्थातच किलवर राणीचा एक दस्त जिंकता येणं हा नशिबाचा भाग आहे कारण उत्तरेकडे असलेली किलवर राणी एक्का-राजाच्या डोक्यावर बसलेली आहे, बगलेत नाही. पाची पंथांच्या अचूक खेळाचे गुण मोजून संगणक डावाचा ‘ठेवा’ सांगू शकतो. या डावात प-पू जोडी बदाम हुकमात खेळून ९ दस्त बनवू शकते, म्हणजे ३ बदामच्या सामान्य ठेक्यात ५० + तीस त्रिक ९० = १४० गुण मिळवू शकते. पण उ-द जोडी त्यांना सुखासुखी १४०चा गुण मिळू नये याचा प्रयत्न करणार. जर उ-द जोडी ३ इस्पिकच्या सामान्य ठेक्यात खेळली आणि त्यांनी ८ दस्त जिंकले तर ठेक्यासाठी एक दस्त कमी पडला म्हणून ५० गुण प-पू जोडीला मिळेल. जर प-पू जोडीने ३ इस्पिकला डबल मारली तर त्यांना ५० ऐवजी १०० गुण मिळतील, पण तरीही ३ बदामाच्या ठेक्यात प-पू जोडीला मिळणाऱ्या १४०पेक्षा आवक कमीच. अशा प्रकारे या डावात दोन्ही जोडय़ांनी आपल्या प्रयत्नांची शिकस्त करून आपल्याला जास्तीतजास्त चांगला असा निकाल मिळवला तर प-पू जोडीला १०० गुण मिळतील. म्हणूनच या डावाचा ‘ठेवा’ उ-द जोडीला ३ इस्पिक डबल या ठेक्यामध्ये वजा १०० गुण! उ-द जोडीच्या भूमिकेतून हा आकडा मांडलेला आहे. वजा या चिन्हाचा अर्थ डावाचे गुण प-पू जोडीला. डाव खेळताना खेळाडूंना हा ‘ठेवा’ शोधायचा असतो, जमल्यास प्रतिस्पर्ध्याच्या चुकीचा फायदा घेऊन त्याहून जास्त गुण मिळवायचा प्रयत्न करायचा असतो. खेळाडूंपेक्षाही समालोचकांना आणि प्रशिक्षकांना हा मुद्दा जास्त उपयोगी आहे. (आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक) panja@demicoma.com