११ रिअल माद्रिद गेल्या वर्षभर ‘प्रशिक्षकांची हकालपट्टी’ या विषयाने चर्चेत राहिला. अँसेलोट्टीनंतर आलेल्या राफेल बेनिटेझ यांची सात महिन्यांतच हटविण्याचा निर्णय माद्रिदचे प्रमुख फ्लोरेंटिनो पेरेझ (जून २००० ते फेब्रुवारी २००६ आणि जून २००९ ते आत्तापर्यंत) यांनी घेतला. १२ वर्षांतील प्रमुखपदाच्या कारकीर्दीत त्यांनी १० प्रशिक्षकांची उचलबांगडी केली. त्यांच्या कार्यकाळातील झिदान हे ११ वे प्रशिक्षक आहेत.

रिअल माद्रिद, स्पेनमधील अव्वल संघापैकी एक. बार्सिलोना, अ‍ॅटलेटिको माद्रिद या कडव्या प्रतिस्पर्धीवर अधिराज्य गाजवणाऱ्या माद्रिद संघाला उतरती कळा लागली आहे. युएफा चॅम्पियन्स लीग, आंतरखंडिय चषक, ला लीगा, युएफा चषक, युएफा सुपर चषक आणि फिफा क्लब विश्वचषक आदी स्पर्धामध्ये मक्तेदारी असलेल्या माद्रिदला आजच्या घडीला विजयासाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे गेल्या हंगामात त्यांची जेतेपदाची पाटी ही कोरीच राहिली. यशोशिखरे गाठण्यापेक्षा ते टिकवणे अवघड असते आणि हेच माद्रिदला जमले नाही. त्यामुळेच कार्लो अँसेलोटीसारख्या यशस्वी प्रशिक्षकाची गच्छंती करण्यात आली, तर अवघ्या सात महिन्यांत राफेल बेनिटेजनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

ख्रिस्तियानो रोनाल्डो, गॅरेथ बॅले, करिम बेंझेमा, जेम्स रॉड्रिग्ज ही दर्जेदार खेळाडूंची फौज असूनही सातत्याने येणारे अपयश हे कुणालाही पटणारे नव्हते. म्हणूनच माद्रिदचे सर्वेसर्वा फ्लोरेंटिनो पेरेझ यांना तडकाफडकी निर्णय घ्यावे लागले. पण त्यांनी १२ वर्षांच्या कारकीर्दीत ११ प्रशिक्षक बदलण्याचा अनोखा विक्रम नोंदवला आहे. त्यामुळे बेनिटेझ यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेला फ्रान्सचा दिग्गज खेळाडू झिनेदीन झिदानला हे आव्हान पेलणे तितकेसे सोपे नाही.

माद्रिदचा माजी खेळाडू असलेल्या झिदानसाठी ही निवड म्हणजे आनंदाचा क्षण असेल, परंतु माद्रिदच्या कामगिरीचा आलेख चढा ठेवण्यासाठीचा मार्ग खडतर आहे.

दिग्गज खेळाडू अन् यशस्वी प्रशिक्षक!

खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकेत सरस ठरलेल्या जोहान क्रुफ आणि केनी डॅलग्लिश यांचा कित्ता गिरवण्यात झिदानला यश येईल का, याची उत्सुकता लागली आहे. यशस्वी खेळाडूंच्या प्रशिक्षकपदाच्या वाटचालीवर टाकलेली नजर.

जोहान क्रुफ

खेळाडू म्हणून क्रुफ यांनी २० हून अधिक जेतेपदे पटकावली. यामध्ये अजॅक्स क्लबकडून खेळताना युरोपियन चषकाच्या जेतेपदाच्या हॅट्ट्रिकचा समावेश आहे. हाच यशाचा आलेख त्यांनी प्रशिक्षकाच्या भूमिकेतही कायम राखला. बार्सिलोना क्लबने त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाल लीग चषक जिंकले. क्रुफ यांनी अजॅक्स व बार्सिलोना अशा दोन क्लबना एकूण १४ जेतेपदे जिंकून दिली.

केन्नी डॅलग्लिश

स्कॉट या नावाने प्रचलित असलेल्या डॅलग्लिश यांनी खेळाडू म्हणून ३० हून अधिक चषक उंचावले. त्यात लिव्हरपूलकडून खेळताना सलग तीन युरोपियन चषकांचा समावेश आहे. प्रशिक्षकाच्या भूमिकेत याच क्लबला त्यांनी तीन युरोपियन चषक आणि दोन एफए चषक जिंकून दिले. तसेच ब्लॅकबर्नला प्रीमिअर लीग जेतेपद पटकावून दिले.

कार्लो अँसेलोटी

रोमा क्लबसह इटालियन सीरिज ‘अ’चे, तर एसी मिलानसह युरोपियन चषकाचे सलग जेतेपद. प्रशिक्षक म्हणून त्यांनी इटली, इंग्लंड आणि फ्रान्समधील लीग जिंकल्या. तसेच रिअल माद्रिदच्या दहाव्या युरोपियन चषक जेतेपदाचे श्रेय त्यांनाच जाते.

अ‍ॅलन शिरेर

इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक २६० गोल आणि इंग्लंडसाठी ३० गोल करणारे जगातिल सर्वोत्तम आघाडीपटू शिरेर यांना प्रशिक्षक म्हणून अपयश आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या न्यूकॅसल क्लबवर प्रीमिअर लीगमधून बाद होण्याची नामुष्की ओढावली.

औल इंसे

इंग्लंडचे दिग्गज बचावपटू मध्यरक्षक इंसे यांनी मँचेस्टर युनायटेडसाठी दोन ईपीएल जेतेपद पटकावली. मात्र प्रशिक्षक म्हणून त्यांना यशाची उंची गाठता आली नाही.

डिएगो मॅरेडोना

अर्जेटिनाला १९८६ मध्ये एकहाती विश्वचषक जिंकून देणाऱ्या डिएगो मॅरेडोना यांना प्रशिक्षक म्हणून तो स्तर कायम राखता आला नाही. २०१० च्या विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेटिनाला जर्मनीकडून ४-० असा दारुण पराभव पत्करावा लागला. प्रशिक्षक म्हणून त्यांना यश मिळाले नाही.

swadesh.ghanekar@expressindia.com