विम्बल्डन म्हणजे ग्रँडस्लॅम विश्वातले मानाचे पर्व. अत्युच्च दर्जाच्या खेळापेक्षाही ते लोभसवाणे ग्रासकोर्ट, सभोवार शुभ्रवस्त्रांकित पेहरावांची लगबग, आधुनिक काळातही जपलेली ब्रिटिशांची शिष्टाचारी परंपरा, रसाळ स्ट्रॉबेरी आणि क्रीमचा सुगंध आणि एकूणच वातावरण मनाला हुरूप देणारे असते. लाल मातीवर होणारी फ्रेंच खुली स्पर्धा सुरू असताना आपल्याकडे घाम काढणारा उन्हाळा असतो. विम्बल्डनचे पडघम वाजत असतानाच आपल्याकडे वरुणराजाचे आगमन झालेले असते. सृष्टीला हिरवे नवचैतन्य मिळवून देणाऱ्या ऋतूत दूर इंग्लंडमध्ये हिरवळीवर रंगणारी मैफल अनुभवणे हा विलक्षण योगायोग. म्हणूनच चारही ग्रँडस्लॅममध्ये विम्बल्डनचे स्थान जगभरातल्या चाहत्यांच्या मनात खास असे आहे.

जोकोव्हिचचा विजयरथ फेडरर रोखणार?

फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदासह नोव्हाक जोकोव्हिचने कारकीर्दीत ग्रँडस्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण केले. पुरुष गटातली तीव्र स्पर्धा आणि दर्जा लक्षात घेता कारकीर्दीत एक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणे हेच मोठे यश आहे. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल ऐन भरात असताना जोकोव्हिचने त्यांची सद्दी मोडत जेतेपदे पटकवण्यास सुरुवात केली. आपण केवळ एका स्पर्धेचा चमत्कार नाही हे त्याने जेतेपदातल्या सातत्याने सिद्ध केले. फेडरर, नदाल या द्वयीचे जोकोव्हिचमुळे त्रिकुटात रूपांतर झाले. गेल्या दशकभरात या तिघांनीच ग्रँडस्लॅम जेतेपदांवर मक्तेदारी राखली आहे. दुखापती आणि ढासळता फॉर्म यामुळे राफेल नदाल विखुरला आहे. गेल्यावर्षी लाल मातीवर अर्थात बालेकिल्ल्यात त्याला नमवण्याची किमया जोकोव्हिचने केली. यंदा फ्रेंच स्पर्धेत नदालने सुरुवात जोशात केली मात्र मनगटाच्या दुखापतीमुळे त्याने माघार घेतली. रॉजर फेडररला आता जेतेपदांपेक्षा खेळण्याचा निखळ आनंद खुणावतो. तीन वर्षांत ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर नसले तरी त्याला फिकीर नाही. ३४व्या वर्षी १७ ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असलेला फेडरर स्वत:ला प्रेरित करतो आणि ग्रँडस्लॅम स्पर्धेची किमान उपांत्य फेरी तरी गाठतोच. यंदा नदालने विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र फ्रेंच स्पर्धा खेळू न शकणारा फेडरर लाडक्या विम्बल्डन स्पर्धेत खेळणार आहे. नदालचे साम्राज्य डळमळले आहे. फेडररचे लक्ष्य जेतेपद असते मात्र जोकोव्हिच त्याचे स्वप्न पूर्ण होऊ देत नाही. आवडत्या ग्रासकोर्टवर जोकोव्हिचच्या यंत्रवत सातत्याला निष्प्रभ करण्याची हातोटी फेडररकडे आहे. मात्र पाच सेटपर्यंत सामना नेण्यात वाकबगार जोकोव्हिच आहे. मॅरेथॉन मुकाबल्यासाठी फेडरर शारीरिकदृष्टय़ा सज्ज आहे का हे पाहणे उत्सुकतेचे आहे. पाठीचे दुखणे आणि गुडघ्यावर झालेली शस्त्रक्रिया यामुळे फेडररच्या हालचालींवर मर्यादा आहेत. दुसरीकडे जोकोव्हिच कारकीर्दीतील स्वप्नवत कालखंडात खेळत आहे. दुखापतींनी मुक्त आणि प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची गुरुकिल्ली लाभलेला जोकोव्हिच दिग्गजतेच्या मखराकडे वेगवान वाटचाल करतो आहे. सलग चारही ग्रँडस्लॅमवर नाव कोरत आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्भुत वर्चस्व गाजवण्यासाठी जोकोव्हिच उत्सुक आहे. फेडररला सूर गवसला तर जोकोव्हिचचा जेतेपदापर्यंतचा मार्ग खडतर होऊ शकतो.

मरे आव्हान देणार?

मोक्याच्या क्षणी कच खाणारा अर्थात चोकर्स हा शिक्का क्रीडाविश्वात प्रचलित आहे. क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ चोकर्स म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच धर्तीवर टेनिसमध्ये अँडी मरे ओळखला जात असे. मात्र कौशल्याला प्रचंड मेहनतीची जोड देत मरेने हा शिक्का पुसला. आताच्या घडीला मरेच्या नावावर तीन ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. मात्र गेल्या वर्षभरात मरे जेतेपदाच्या समीप येतो आणि हरतो असेच चित्र आहे. प्रत्येक ग्रँडस्लॅम स्पर्धेत जेतेपदासाठी तो शर्यतीत असतो. किमान उपांत्य फेरी तरी तो गाठतोच मात्र जेतेपद त्याला हुलकावणी देते आहे. मरेचा मित्र नोव्हाक जोकोव्हिच त्याच्या स्वप्नातला अडथळा आहे. तो पार करत घरच्या मैदानावर चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यात विम्बल्डन जेतेपद पटकावण्यासाठी मरेला विशेष प्रदर्शन करावे लागणार आहे. इंग्लंडची आशा असलेल्या मरेला खेळात सातत्याबरोबरच मानसिक कणखर होणेही गरजेचे आहे.

सेरेनाला पर्याय तयार

वाढते वय आणि दुखापतींचा ससेमिरा यामुळे सेरेना विल्यम्सला लौकिकाला साजेसा खेळ करणे अवघड होते आहे. ऐन भरात असलेल्या सेरेनाला रोखणे अन्य महिला टेनिसपटूंसाठी अशक्यप्राय आव्हान आहे. यंदा मात्र सेरेनाला ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सेरेनाला कसे हरवायचे या पेचात पडलेल्या बहुतांशजणींना गुरुमंत्र सापडला आहे. आकर्षक फॅशनेबल कपडे आणि तत्सम विश्वात मग्न महिला टेनिसपटूंना कामगिरीत सातत्य राखणे अवघड जाते. याचीच परिणती मानांकित खेळाडू झटपट गाशा गुंडाळण्यात येते. जेतेपदासाठी शर्यतीत असलेल्या खेळाडूंना मानांकने दिली जातात. महिला टेनिसमध्ये मानांकित खेळाडूच सगळ्यात आधी गाशा गुंडाळायला घेतात. यंदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेत अँजेलिक कर्बरने तर फ्रेंच खुल्या स्पर्धेत गार्बिन म्युगुरुझाने जेतेपदावर नाव कोरले. ग्रँडस्लॅम विजेत्या कर्बरने पुढच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत पहिल्या फेरीत गाशा गुंडाळला. गार्बिनकडून सातत्याची अपेक्षा आहे. पेट्रा क्विटोव्हा, अ‍ॅग्निझेस्का रडवानस्का यांच्यासह अनेकींनी गुणवत्तेची झलक अनेकदा दाखवली आहे. मात्र ग्रँडस्लॅम जेतेपदाला लागणारा निग्रह, जिद्द आणि सातत्य यांचा अभाव जाणवतो. पोशाख आणि चमकोगिरीपेक्षा फक्त खेळाकडेच लक्ष दिल्यास नवी विजेती मिळू शकते.

भारतासाठी सालाबादप्रमाणे

सानिया मिर्झा, लिएण्डर पेस, रोहन बोपण्णा- सालाबादप्रमाणेच ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठीचे हे त्रिकूट विम्बल्डनमध्येही अब्जावधी भारतीयांच्या आशा पेलणार आहे. सानिया मार्टिना हिंगिससह जेतेपद पटकावण्यासाठी आतुर आहे. बोपण्णा आणि पेस आपापल्या सहकाऱ्यांसह खेळणार आहेत. नाइलाजास्तव का होईना पण हेच तिघे रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या तिघांनंतर असलेली प्रचंड पोकळीच आपल्या टेनिसची स्थिती सिद्ध करणारी आहे.

 

– पराग फाटक
parag.phatak@expessindia.com