विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : सबालेंका, श्वीऑनटेक, प्लिस्कोव्हा चौथ्या फेरीत

हंगेरीच्या मार्टन फुक्सोव्हिक्सने अर्जेटिनाच्या श्वार्ट्झमनला ६-३, ६-३, ६-७, ६-४ असे पराभूत केले.

मुगुरूझा, श्वार्ट्झमन यांचे आव्हान संपुष्टात

वृत्तसंस्था, लंडन

जागतिक टेनिस क्रमवारीत चौथ्या स्थानावरील आर्यना सबालेंका, नवव्या क्रमांकावरील इगा श्वीऑनटेक आणि १३व्या क्रमांकावरील कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची शुक्रवारी चौथी फेरी गाठली. परंतु गॅब्रिन मुगुरूझा व दिएगो श्वार्ट्झमन यांचे आव्हान संपुष्टात आले.

महिला एकेरीत बेलारूसच्या द्वितीय मानांकित सबालेंकाने कोलंबियाच्या मारिया कॅमिला ओसोरिओ सेरानोवर ६-०, ६-३ असे वर्चस्व गाजवले. याचप्रमाणे माजी फ्रेंच विजेत्या पोलंडच्या सातव्या मानांकित श्वीऑनटेकने रोमानियाच्या इरिना-कॅमेलिया बेगूचा ६-१, ६-० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. चेक प्रजासत्ताकच्या आठव्या मानांकित प्लिस्कोव्हाने आपल्याच देशाच्या तेरेझा मार्टिनकोव्हाला ६-३, ६-३ अशा फरकाने नामोहरम केले. थेट प्रवेशिकेद्वारे विम्बल्डन पदार्पणाची संधी मिळालेल्या लुडमिला सॅमसोनोव्हाने अमेरिकेच्या स्लोआनी स्टीफन्सला ६-२, २-६, ६-४ असे नमवून लक्ष वेधले. टय़ुनिशियाच्या २१व्या मानांकित ऑन्स जॅबीरने स्पेनच्या ११व्या मानांकित मुगुरूझाचा ५-७, ६-३, ६-२ असा पराभव केला.

पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत रशियाच्या आंद्रे रुबलेव्हने प्रथमच विम्बल्डनची चौथी फेरी गाठताना फॅबिओ फॉगनिनीला ६-३, ५-७, ६-४, ६-२ असे हरवले. सर्बियाच्या अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने डेनिस कुडलाचे आव्हान ६-४, ६-३, ७-६ असे मोडित काढले. रशियाच्या २५व्या मानांकित कॅरीन खाचानोव्हने अमेरिकेच्या फ्रान्सिस टिआफोईवर ६-३, ६-४, ६-४ असा विजय मिळवला. हंगेरीच्या मार्टन फुक्सोव्हिक्सने अर्जेटिनाच्या श्वार्ट्झमनला ६-३, ६-३, ६-७, ६-४ असे पराभूत केले.

ऐतिहासिक सामन्यात सानिया-रोहन विजयी

’  ऐतिहासिक भारतीय जोडय़ांमधील मिश्र दुहेरीच्या सामन्यात सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी अंकिता रैना आणि रामकुमार रामनाथन यांचा ६-२, ७-६ (७/५) असा पराभव करून दुसरी फेरी गाठली आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या आधुनिक युगात प्रथमच दोन भारतीय जोडय़ा एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत पात्रतेसाठी २१ वेळा प्रयत्न करणाऱ्या रामकुमारने ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये मिश्र दुहेरीत पदार्पण केले.

महिला दुहेरीत अंकिता पराभूत

’  अंकिता रैनाचे विम्बल्डनच्या मुख्य फेरीतील पदार्पण अपयशी ठरले. महिला दुहेरीत लॉरेन डेव्हिसच्या साथीने खेळताना पहिल्याच फेरीत या जोडीचे आव्हान संपुष्टात आले. अमेरिकेच्या असिया मोहम्मद आणि जेसिका पेगुला जोडीने अंकिता-लॉरेन जोडीचा ७० मिनिटांत ६-३, ६-२ असा पाडाव केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aryna sabalenka reached the round of 16 at wimbledon 2021 zws