ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठेची अ‍ॅशेस मालिका येत्या गुरुवारपासून सुरू होत आहे. या मालिकेला निर्णायक वळण देऊ शकेल असे तंत्रज्ञान या निर्णय देण्यासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे. रिअल टाइम स्निकोमीटर असे या पद्धतीचे नाव असून मैदानावरील पंचांना ही पद्धत वापरता येईल. मालिकेचे थेट प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या चॅनेल नाइनने या संदर्भात बीबीजी स्पोर्ट्सशी करार केला आहे. या करारानुसार हॉटस्पॉट आणि स्निको तंत्रज्ञान मालिकेदरम्यान उपलब्ध असणार आहे. पंच पुनर्आढावा पद्धतीच्या अंतर्गत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या मुद्दय़ावरून क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड एण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेल्या करारामुळे रिअल टाइम स्निकोला हिरवा कंदील मिळाला आहे. हॉटस्पॉट, स्निको यांच्यासह ईगल आय ही चेंडूच्या टप्प्याचा वेध घेणारी यंत्रणा तसेच स्टंप (यष्टी) माइक्रोफोन वापरण्यात येणार आहे.
इंग्लंडमध्ये झालेल्या शेवटच्या अ‍ॅशेस मालिकेत पंच पुनर्आढावा पद्धत वादग्रस्त ठरली होती. तंत्रज्ञान सर्वसमावेशक नसेल तर त्याचा वापर होऊ नये असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने आपल्या स्तंभलेखनात नोंदवले आहे. बॅटने चेंडूची कड घेतली आहे की नाही या संदर्भात हॉटस्पॉट ठोस सांगू शकेलच असे नाही, असे या तंत्रज्ञानाची निर्मिती करणाऱ्यांनी सांगितले आहे, त्यामुळे हे तंत्रज्ञान संपूर्ण दोषमुक्त होईपर्यंत वापरण्यात येऊ नये, असे क्लार्कने म्हटले आहे. दरम्यान आयसीसीने अ‍ॅशेस मालिकेदरम्यान रिअल टाइम स्निकोला मान्यता दिली असली तरी हे तंत्रज्ञान अचूकपणे वापरण्यासाठी पंचांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे की नाही याबाबत सुस्पष्टता नाही. हे तंत्रज्ञान पंचांना अचूक निर्णय देण्यासाठी मदतच करेल, या तंत्रज्ञानामुळे कोणताही वाद उद्भवणार नाही असा विश्वास चॅनेल नाइनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ८० षटकांच्या डावात दोन रिव्ह्य़ू संघांना उपलब्ध असणार आहेत.

स्निकोमीटर म्हणजे काय?
क्रिकेटच्या थेट प्रक्षेपणादरम्यान बॅटने चेंडूची कड घेतली आहे की नाही हे स्पष्ट करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान. स्निकोमीटर असे नाव असलेले हे तंत्रज्ञान स्निको नावाने प्रसिद्ध. आलेखीय रेखनाद्वारे ध्वनी आणि छायाचित्रण यांचे विश्लेषण केले जाते. यानुसार बॅटने चेंडूची कड घेतली आहे की नाही हे स्पष्ट केले जाते. इंग्लंडच्या संगणकतज्ञ अ‍ॅलन प्लासकेट यांनी ९०च्या दशकात तंत्रज्ञान विकसित केले होते. इंग्लंडमधील चॅनेल-४ ने पहिल्यांदा हे तंत्रज्ञान वापरले होते.