‘अॅशेस’मध्ये यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत मालिकेत ४-० ने बाजी मारली आहे. पाचव्या आणि अंतिम कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा एक डाव आणि १२३ धावांनी पराभव केला असून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अॅशेस मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सिडनीत रंगला. इंग्लंडचा पहिला डाव ३४६ धावांवर आटोपला होता. याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने मार्श बंधूंच्या शतकांच्या बळावर धावांचा डोंगरच उभा केला होता. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ६४७ धावांवर घोषित केला. कांगारुंनी पहिल्या डावात ३०३ धावांची बहुमोल आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडची अवस्था बिकट झाली होती. फिरकी गोलंदाज नॅथन लिऑनने इंग्लंडच्या फलंदाजांची भंबेरी उडवत चौथ्या दिवस अखेर इंग्लंडची अवस्था ४ बाद ९३ धावा अशी केली होती.

सोमवारी पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव गुंडाळला. कर्णधार जो रुटला डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने तो ५८ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. रुटचा अपवाद वगळता इंग्लंडचे अन्य फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकले नाही. जॉनी बेअरस्टोने ३८ धावांची खेळी करुन रुटला साथ दिली. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १८० धावांवरच आटोपला. ऑस्ट्रेलियातर्फे लिऑनने ३ तर पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. स्टार्क आणि हॅझलवूड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पाचव्या कसोटीत एकूण ८ विकेट घेणारा पॅट कमिन्स सामनावीर तर मालिकेत ६८७ धावांची बरसात करणारा कर्णधार स्टीव्हन स्मिथ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

इंग्लंडसाठी अॅशेसमधील हा पराभव लाजीरवाणा ठरला आहे. २०१५ मध्ये झालेल्या मालिकेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ३-२ ने पराभव करत अॅशेसवर नाव कोरले. मात्र ती मालिका इंग्लंडमध्ये झाली होती. ऑस्ट्रेलियात २०१०-११ मध्ये झालेल्या मालिकेत इंग्लंडने शेवटचा विजय मिळवला होता. त्यानंतर अद्याप एकदाही इंग्लंडला ऑस्ट्रेलियात विजय मिळवता आलेला नाही. आता ऑस्ट्रेलियातील विजयासाठी इंग्लंडला २०२१ पर्यंत वाट पाहावी लागेल. २०१९ मधील अॅशेस मालिका इंग्लंडमध्ये होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashes 2017 18 australia claim innings 123 run win in fifth test syndey beat england by 4 0 in series steven smith
First published on: 08-01-2018 at 10:12 IST