विम्बल्डन २०२१चे विजेतेपद जिंकून इतिहास रचणारी अ‍ॅश्ले बार्टी ही क्रिकेटपटूही राहिली आहे. ब्रिस्बेन हीटसाठी तिने महिला बिग बॅश लीगमध्येही आपली चमक दाखवली होती. मात्र आता तिने टेनिसमध्ये आपला ठसा उमटवला असून विम्बल्डनची अंतिम फेरी जिंकत एक नवीन विक्रम नोंदवला आहे. शनिवारी महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाच्या अ‍ॅश्ले बार्टीने विम्बल्डन २०२१चे विजेतेपद जिंकले. यापूर्वी तिने फ्रेंच ओपनचेही विजेतेपद पटकावले होते. हे तिचे पहिले विम्बल्डन जेतेपद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेनिसनंतर क्रिकेट, मग पुन्हा टेनिस

२५ वर्षीय बार्टी महिला बिग बॅश लीगमध्येही खेळली आहे. वयाच्या १५व्या वर्षापासून ती स्टार टेनिसपटू आहे आणि २०१३मध्ये विम्बल्डनमध्ये पदार्पण केले. २०१४मध्ये तिने टेनिसमधून ब्रेक घेऊन क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ती फक्त १९ वर्षांची होती. तिने महिला बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीटसाठी ९ सामन्यांत ११.३३च्या सरासरीने ६८ धावा केल्या. यापूर्वी, ती वेस्टर्न सबडर्ब जिल्हा क्रिकेट क्लबकडून खेळली होती. बार्टीने २०१६मध्ये टेनिस क्षेत्रात परतण्याचा निर्णय घेतला.

 

विम्बल्डन २०२१च्या अंतिम सामन्यापूर्वी ब्रिस्बेन हीटने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या माजी खेळाडूला शुभेच्छा दिल्या. त्यांनी बार्टीची दोन छायाचित्रे शेअर केली. एका चित्रात ती फलंदाजी करताना दिसली आहे आणि दुसर्‍या चित्रात ती टेनिस खेळत आहे.

अंतिम लढतीत प्लिस्कोव्हाला हरवले

बार्टीने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिचा संघर्षपूर्ण अंतिम लढतीत पाडाव करत विम्बल्डन स्पर्धेच्या जेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरले. फ्रेंच खुल्या स्पर्धेनंतर (२०१९) बार्टीचे हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. प्लिस्कोव्हाची कडवी लढत मोडीत काढत बार्टीने ६-३, ६-७ (४/७), ६-३ असा विजय मिळवत जेतेपद पटकावले. मार्गारेट कोर्ट (१९६३, १९६५ आणि १९७०), इव्होनी गुलागाँग कावली (१९७१ आणि १९८०) यांच्यानंतर विम्बल्डनचे जेतेपद पटकावणारी बार्टी ही ऑस्ट्रेलियाची तिसरी महिला टेनिसपटू ठरली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashleigh barty once a cricketer now a wimbledon champion adn
First published on: 11-07-2021 at 18:44 IST