भारताविरुद्धच्या सर्वाधिक मोठय़ा पाठलागाच्या खेळीत शतकी योगदान दिलेल्या पीटर हॅण्डस्कॉम्बने धडाकेबाज फलंदाज अ‍ॅश्टन टर्नरची मुक्तकंठाने प्रशंसा केली. स्थानिक क्रिकेटप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील तो तुफानी फलंदाजी करू शकेल, हा त्याच्याबाबत वाटत असलेला विश्वास त्याने सार्थ ठरवल्याचे हॅण्डस्कॉम्बने सांगितले.

टर्नरने ४३ चेंडूंमध्ये ८४ धावांची तुफानी खेळी करीत ऑस्ट्रेलियाला अशक्य असे ३५९ धावांचे लक्ष्य गाठून दिले तेदेखील चार गडी आणि १३ चेंडू शिल्लक राखून. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. ‘‘बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉर्चर्सकडून खेळताना तो काय कमाल करू शकतो, ते आम्ही बघितले होते. त्यामुळे तो अखेरच्या टप्प्यात मोठे फटके मारू शकतो, याबाबत आम्हाला सर्वानाच विश्वास होता. मात्र, बुमराला त्याने ज्या प्रकारे फटके लगावले, ते खरोखरच अविश्वसनीय होते. या खेळीमुळे त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असेल. तसेच त्याला भविष्यात या आत्मविश्वासाचा खूप फायदा होईल,’’ असेही हॅण्डस्कॉम्बने सांगितले.

‘‘जेव्हा अ‍ॅश्टनने फटकेबाजी सुरू केली, तेव्हा पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या एकाही खेळाडूने त्याची जागा सोडली नाही. प्रत्येक जण जणू अंधश्रद्धाळू झाले होते. माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून बघायचे असल्यास, हा सामना माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम सामना होता, असे म्हणता येईल. इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकापूर्वी अशा प्रकारचा विजय आम्हाला सगळ्यांनाच प्रेरणा देणारा ठरला आहे. या विजयामुळे खूपच वेगळ्या प्रकारची भावना संघातील खेळाडूंमध्ये निर्माण झाली असून त्या व्यक्त करायला माझे शब्द अपुरे पडत आहेत. या विजयात मीसुद्धा शतकी योगदान दिल्याचा आनंद आहे,’’ असेही हॅण्डस्कॉम्बने सांगितले.

‘‘माझ्या आणि उस्मान ख्वाजाच्या १९२ धावांच्या भागीदारीदरम्यान आम्ही एकमेकांशी जास्त बोललो नाही. मात्र, दव पडू लागल्यावर फिरकीपटूंचा चेंडू फारसा वळत नाही, हे लक्षात आल्याने आम्ही त्याचा फायदा उठवला. या विजयामुळे आम्ही आता कोणतेही मोठे लक्ष्य गाठू शकतो, असा खूप मोलाचा आत्मविश्वास मिळाला आहे,’’ असेही हॅण्डस्कॉम्बने सांगितले.

विश्वास सार्थ ठरवल्याचे समाधान

माझ्या कारकीर्दीत मी पुन्हा एकदिवसीय सामने खेळू शकेन की नाही, ते मला माहिती नव्हते. मात्र, अचानकपणे मला या दौऱ्यात संधी मिळाली. तसेच कारकीर्दीतील या पहिल्या शतकी खेळीसह संघाला विजय मिळवून देत माझ्या निवडीबाबतचा विश्वास मी सार्थ ठरवल्याचे समाधान असल्याचे हॅण्डस्कॉम्बने नमूद केले.