बॅडमिंटनमध्ये दुहेरी हा भारताचा कच्चा दुवा असल्याचे जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीच्या दिवशीच सिद्ध झाले. मिश्र दुहेरी प्रकारात अश्विनी पोनप्पा आणि तरुण कोना जोडीला पहिल्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत सोळाव्या स्थानी असणाऱ्या आंद्रेस क्रिस्टिनसेन आणि ज्युली हौऊमन जोडीने अश्विनी-तरुण जोडीवर २१-१६, २७-२५ असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये डेन्मार्कच्या जोडीने जबरदस्त वर्चस्व गाजवत बाजी मारली. सामन्यातले आव्हान जिवंत राखण्यासाठी तरुण-अश्विनी जोडीला दुसरा गेम जिंकणे क्रमप्राप्त होते. दमदार स्मॅशेस आणि नेटजवळून सुरेख खेळ करत कडवी टक्कर दिली. मात्र प्रदीर्घ काळ चाललेल्या दुसऱ्या गेममध्ये अखेरच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे अश्विनी-तरुणला जोडी पराभूत झाली.
दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. दुसऱ्या फेरीत या जोडीचा मुकाबला चीनच्या क्विंग तिआन आणि युनलेई झाओ जोडीशी होणार आहे.
दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या सायना नेहवालची सलामीची लढत नतालिआ परमिनोव्हाशी होणार आहे. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर सायनाने सुपर सीरिज स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. मात्र पायाला झालेल्या दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत तिला सहभाही होता आले नाही. या स्पर्धेच्या निमित्ताने दमदार पुनरागमन करण्याची सायनाला संधी आहे.