आशिया चषक स्पध्रेतील अंतिम फेरी गाठण्याच्या आशा मावळलेल्या भारतीय संघाने साखळीमधील आपल्या अखेरच्या औपचारिक लढतीत दुबळ्या अफगाणिस्तानवर आरामात विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारणाऱ्या भारताने रवींद्र जडेजा (४/३०) व रविचंद्रन अश्विन (३/३१) यांच्या प्रभावी माऱ्याच्या बळावर अफगाणिस्तानचा डाव ४५.२ षटकांत १५९ धावांत गुंडाळला. मग ३२.२ षटकांत व दोन फलंदाजांच्या मोबदल्यात हे अंतर सहज पार करीत या स्पध्रेमध्ये दुसऱ्या विजयाची नोंद केली.
विजयासाठी आवश्यक असणारे तुटपुंजे लक्ष्य पार करण्यात भारताच्या अजिंक्य रहाणे व शिखर धवन या सलामीवीरांच्या अर्धशतकांचा महत्त्वाचा वाटा होता. भारताने या विजयासह चार गुण व एक बोनस गुणही मिळविला, मात्र पाकिस्तान व श्रीलंका यांनी यापूर्वीच अंतिम फेरीत स्थान मिळविल्यामुळे भारताचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न मंगळवारीच संपुष्टात आले होते.
बुधवारी भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यापुढे अफगाणिस्तानच्या फलंदाजांना अपेक्षेइतका सूर सापडला नाही. समीउल्ला शेनवारीने आत्मविश्वासाने खेळ करीत ५० धावा केल्या. एकदिवसीय सामन्यातील त्याचे हे पाचवे अर्धशतक आहे. त्याने सहा चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. त्याचे अन्य सहकाऱ्यांपैकी नूर अली झाद्रान (६ चौकारांसह ३१), महम्मद शहजादे (२ चौकार व एक षटकारासह २२) यांचा अपवाद वगळता एकही खेळाडू दोन आकडी धावा करू शकला नाही. त्यांनी भारताच्या प्रभावी फिरकी माऱ्यापुढे खेळताना ४६ व्या षटकापर्यंत डाव लांबविला हीच त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली.
भारताकडून रवींद्र जडेजाने ३० धावांमध्ये ४ बळी घेतले. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. रविचंद्रन अश्विनने ३१ धावांत तीन बळी घेतले. अमित मिश्रानेही एक बळी घेत फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राखले. उर्वरित दोन बळी द्रुतगती गोलंदाज महम्मद शमीला मिळाले.
रोहित शर्मा याच्याऐवजी रहाणेने धवनसोबत भारताच्या डावाला प्रारंभ केला. त्यांनी आश्वासक खेळ करीत सलामीसाठी २३.३ षटकांत १२१ धावांची भागीदारी केली व संघाच्या विजयाचा पाया उभारला. ही जोडीच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करील असे वाटत होते. तथापि, मिरवेस अश्रफने रहाणेला बाद करीत ही जोडी फोडली. त्यानंतर लगेचच धवनही तंबूत परतला. रहाणेने ६६ चेंडूंत पाच चौकारांसह ५६ धावा केल्या. धवनने ७८ चेंडूंत ६० धावा करताना चार चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. ही जोडी बाद झाल्यानंतर रोहित शर्मा (नाबाद १८) व दिनेश कार्तिक (नाबाद २१) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. अफगाणिस्तानकडून अश्रफ व महम्मद नबी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
रवींद्र जडेजा १०-१-३०-४
धावफलक
अफगाणिस्तान : नूर अली झाद्रान झे. कोहली गो. जडेजा ३१, नवरोझ मंगल त्रिफळा गो. शमी ५, रहमत शाह पायचीत गो. जडेजा ९, असघर स्टानिकझाई झे. मिश्रा गो. जडेजा ५, नजिबुल्ला झाद्रान झे. बिन्नी गो. अश्विन ५, महम्मद नबी झे. कार्तिक गो. जडेजा ६, महम्मद शहजादे पायचीत गो. अश्विन २२, समीउल्ला शेनवारी पायचीत गो. शमी ५०, मिरवेस अश्रफ झे. कोहली गो. मिश्रा ९, शापूर झाद्रान पायचीत गो. अश्विन १, दाउलत झाद्रान नाबाद २, अवांतर १४, एकूण ४५.२ षटकांत सर्व बाद १५९
बाद क्रम : १-३०, २-५४, ३-५५, ४-६०, ५-६४, ६-८३, ७-९५, ८-१११, ९-१३७, १०-१५९.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ८-१-२५-०, महम्मद शमी ७.२-०-५०-२, अमित मिश्रा १०-१-२१-१, रवींद्र जडेजा १०-१-३०-४, रविचंद्रन अश्विन १०-३-३१-३.
भारत : अजिंक्य रहाणे पायचीत गो. अश्रफ ५६, शिखर धवन त्रिफळा गो. नबी ६०, रोहित शर्मा नाबाद १८, दिनेश कार्तिक नाबाद २१, अवांतर ५, एकूण ३२.२ षटकांत २ बाद १६०.
बाद क्रम : १-१२१, २-१२३.
गोलंदाजी : महम्मद नबी १०-०-३०-१, शापूर झाद्रान ६-०-२५-०, दाउलत झाद्रान ५-०-२५-०, समीउल्ला शेनवारी ४.२-०-३२-०, मिरवेस अश्रफ ५-०-२६-१. रहमत शाह २-०-२१-०.
अफगाणिस्तानविरुद्ध आमच्या खेळाडूंनी सर्वच आघाडय़ांवर चांगली कामगिरी केली व सहज विजय मिळवून दिला. पाकिस्तानविरुद्ध बांगलादेश विजय मिळवेल अशी आम्ही आशा करीत होतो. मात्र आमच्या आशा धुळीस मिळाल्या. त्यामुळेच आम्ही अंतिम फेरीत स्थान मिळवू शकलो नाही. शेवटच्या लढतीत दडपण नसल्याने निश्चिंत मनाने आम्ही खेळू शकलो.
विराट कोहली (भारताचा कर्णधार)