आशिया चषकातील भारताच्या दोन्ही सामन्यांत यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या विचलीतपणाचा तोटा संघाला भोगावा लागल्याचे भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी म्हटले आहे.
चेंडुकडे नीट लक्ष न ठेवल्यामुळे पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात महत्वाच्या वेळी प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना जीवनदान मिळाले. याचा तोटा भारतीय संघाला झाला असल्याचे किरण मोरे म्हणाले. तसेच धोनीनंतर संघात दिनेश कार्तिकच चांगला यष्टीरक्षक आहे यात काहीच शंका नाही परंतु, महत्वाच्या क्षणी दिनेशने केलेला विचलीतपणा दुर्लक्ष करण्याजोगा नाही असेही मोरे म्हणतात.
जेव्हा केव्हा आपल्याला संघात संधी मिळते. त्या प्रत्येकवेळी आपली कामगिरी चांगलीच होईल असे नसते. परंतु, खेळावर आणि आपल्या उद्दिष्टावर आपले लक्ष केंद्रीत असणे महत्वाचे असते. तसेच संघाचा कर्णधार यष्टीरक्षक असल्याची जाणीव ठेऊन त्याच्या जागी आपल्याला संधी मिळाली याचे भानही दिनेशने राखायला हवे. त्यादृष्टीकोनातून संयमी आणि जबाबदारी यष्टीरक्षकाची भूमिका दिनेश कार्तिकने निभवावी असेही किरण मोरे म्हणाले.
दिनेश कार्तिकने आशिया चषकातील गेल्या दोन सामन्यांत भारतीय संघाकडून दोनवेळा महत्वाच्या वेळी खराब यष्टीरक्षण करून दोन फलंदाजांना जीवनदान दिले होते. याचा मोठा तोटा भारतीय संघाला झाला. तसेच फलंदाजीच्या रूपातही दिनेश कार्तिक स्वत:ला अजूनही सिद्ध करू शकलेला नाही.